देवेंद्र पोल्हे लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागात विविध रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी रसवंती गृहे थाटायला सुरुवात झाली आहे. मात्र, या ठिकाणी वापरले जाणारे पाणी शुद्ध आहे का? रसामध्ये टाकण्यात येणारा बर्फ शुद्ध पाण्यापासून तयार केला जातो का?, याबाबतच्या तपासणीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, शक्यतो बिनाबर्फाचा रस पिणे कधीही आरोग्यासाठी चांगले असते.
व्यावसायिकही चार महिन्यांचे सिझन म्हणून परवानगीशिवाय हा व्यवसाय सुरू करीत आहे. तालुक्यात अशी रसवंतीची दुकाने थाटली असताना, बऱ्याच व्यावसायिकांना रितसर परवानगीचा विसर पडल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या थंड पेयांची दुकाने थाटली जातात. यात आईस्क्रीम, लस्सी, कोल्ड्रिंग, लिंबूपाणी आणि रसवंती इत्यादी दुकानाचा यात समावेश होतो. यातील लिंबू पाणी आणि रसवंती या ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर होत आहे.
प्रशासनाची परवानगी नाहीचवास्तविक रसवंतीचा व्यवसाय सुरू कारण्यापूर्वी नियमाप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या विभागाशी संबंधित अनेक व्यवसाय परवानगी न घेताच सर्रास हा व्यवसाय सुरू करतात. या व्यावसायिकांची कधी अन्न व औषध विभागाने तपासणी केल्याची अथवा कार्यवाही केल्याचेही ऐकण्यात नाही. मोजक्या दिवसांचा व्यवसाय असल्यानेही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते.
बिना बर्फाचा रस महाग काअनेकदा रस घेताना तो बर्फाचा की विना बर्फाचा हवा, असे विचारले जाते, बर्फ वितळून त्याचे पाणी होते. त्यामुळे उसाच्या एका कांडक्यात पाच ग्लास रस तयार होतो. याउलट बिना बर्फाच्या रसासाठी जास्त ऊस लागतो. सोबतच अद्रक, लिंबू वेगळे टाकावे लागते. त्यामुळे बिना बर्फ रस बर्फाच्या रसापेक्षा महाग विकला जातो. आणि शरीरासाठीही तो चांगला असतो.
बर्फाचा रस १० रुपयाला हाफ, १५ फुलसध्या बाजारात थंडपेयांची मागणी वाढत आहे. त्यातही उसाच्या रसाला नागरिकांची पसंती आहे. बर्फाचा रस एक छोटा ग्लास दहा रुपयाला मिळतो. तर बिना बर्फाचा रस एक छोटा ग्लास १५ रुपयाला मिळतो. उसाच्या तुलनेत बर्फ स्वस्त असल्याने हा फरक आहे.
बर्फ टाकलेलाच रस हवाय !
- उन्हाची दाहकता जेव्हा वाढते, तेव्हा थंड पिण्याकडे जवळपास सर्वच व्यक्तीचा कल असतो.
- अशावेळी नागरिक बर्फ टाकलेला उसाचा रस, लस्सी, लिंबूपाणी पिण्यासाठी पसंती देतात.
...तर पोटाचा त्रासअस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ पोटात गेल्यास घसा दुखी, जुलाब, तसेच पोटात इंन्फेक्शन होऊन पोट दुखीची समस्या उद्भवू शकते. सर्दी-खोकल्याचींही बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी रसवंतीगृहावर रस पिताना या गोष्टींची खरबदारी घेणे गरजेचे आहे.
बर्फाची शुद्धता तपासली जाते का?खाण्यासाठी असलेला बर्फ शुद्ध पाण्यापासुन बनविणे बंधनकारक आहे. मात्र असा बर्फ महाग असल्याने अनेकदा थंड पेय विक्रेते स्वस्त पडणारा बर्फ खरेदी करतात.
"शुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फच वापरणे बंधनकारक असून, व्यावसाय सुरू करताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे."- अमितकुमार अप्लाप, अन्न व औषधी प्रशासन, यवतमाळ.