बंदीभागाच्या नशिबी खराबच रस्ते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:43 AM2021-02-24T04:43:02+5:302021-02-24T04:43:02+5:30

नागरिक त्रस्त : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, कंत्राटदारांची मनमानी ढाणकी : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात कधीही चांगले रस्ते मिळालेले ...

Why are the fortunes of the detainees bad? | बंदीभागाच्या नशिबी खराबच रस्ते का?

बंदीभागाच्या नशिबी खराबच रस्ते का?

Next

नागरिक त्रस्त : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, कंत्राटदारांची मनमानी

ढाणकी : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात कधीही चांगले रस्ते मिळालेले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरी या भागातील प्रवास काही सुखकर होऊ शकलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून, कंत्राटदार मनमानी कामे करून बिल काढून घेत आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्याचे शेवटचे टोक असलेल्या पैनगंगा अभयारण्यातील भागाला बंदी भाग म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणून उमरखेड तालुका ओळखला जातो. या बंदी भागात ४० पेक्षा जास्त खेडेगाव आहेत. यांना जवळचे शहर म्हणजे ढाणकी किंवा तालुक्याचे ठिकाण म्हणजे उमरखेड. बंदी भागातील दराटी, जवराळा, मोरचंडी, जेवली या गावातील ग्रामस्थांना दवाखाना असो किंवा इतर कोणतेही काम असो, ढाणकी किंवा उमरखेडला येण्यासाठी ६० ते ६५ किमीचा प्रवास करावा लागतो. मात्र, हा प्रवास सुखाचा नाही. ढाणकीपासून बिटरगाव - जेवली रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली. पण या गावांना चांगला रस्ता मिळाला नाही. वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवावे लागतात. एवढे करूनही सुरक्षित प्रवास होईल, याची कुठलीही शाश्वती नाही. रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. या रस्त्यावर यावर्षी चार अपघात झाले. चार व्यक्तिंना जीव गमवावा लागला. बंदी भागातील ग्रामस्थांना या रस्त्यामुळे दवाखानासुद्धा अवघड झाला. बऱ्याच वेळा गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्याआधीच या खराब रस्त्यांमुळे रस्त्यातच प्रसूत होण्याची वेळ येत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. कंत्राटदाराने कशा प्रकारे काम केले, हे बांधकाम विभाग पाहत नाही. त्यामुळे कंत्राटदार थातूरमातूर काम करून आपले बिल काढून घेतात.

निवडणूक असली की, उमेदवार या भागात येतात आणि मोठमोठी आश्वासने देऊन निघून जातात. मात्र, समस्या आहे तशीच राहाते. आता या सर्व स्थितीला ग्रामस्थ कंटाळले असून, रस्ता केव्हा मिळणार? असा सवाल करत आहेत.

Web Title: Why are the fortunes of the detainees bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.