सासूचा नोकरीतील वारस मुलगा की सून? मॅटसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:54 PM2018-02-07T12:54:50+5:302018-02-07T12:59:25+5:30

सासूच्या निधनानंतर अनुकंपा नोकरीचा वारसदार मुलगा की सून ? या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई ‘मॅट’मध्ये कुटुंबाच्या व्याख्येवर अनेक तास खल चालला. अखेर ‘मॅट’ने निर्णय घेण्याच्या सूचना शासनाला दिल्या.

Who is eligible for Claim for job; son in law or daughter-in-law? question for Mat | सासूचा नोकरीतील वारस मुलगा की सून? मॅटसमोर प्रश्न

सासूचा नोकरीतील वारस मुलगा की सून? मॅटसमोर प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देकुटुंबाच्या व्याख्येवर ‘मॅट’मध्ये खलचेंडू शासनाच्या कोर्टात, सुनेला तूर्त दिलासा

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सासूच्या निधनानंतर अनुकंपा नोकरीचा वारसदार मुलगा की सून ? या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई ‘मॅट’मध्ये कुटुंबाच्या व्याख्येवर अनेक तास खल चालला. अखेर ‘मॅट’ने निर्णय घेण्याच्या सूचना शासनाला दिल्या. मात्र त्यापूर्वी सुनेची काढून घेतलेली नोकरी तिला पुन्हा बहाल करण्याचे व त्यानंतर काय तो निर्णय घेण्याचे आदेश ‘मॅट’ने दिले.
कविता संजय घोंगडे असे या सूनेचे नाव आहे. सोलापूरच्या उपवनसंरक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचा हवाला देत वन विभागाने कविताला अचानक नोकरीतून काढून टाकले. अनुकंपा नोकरीसाठी वारसदार म्हणून तुम्ही पात्र नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या निर्णयाविरोधात कविता घोंगडे यांनी अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट प्रशासकीय न्यायाधीकरण) धाव घेतली. तेथे वारसदार नेमका मुलगा की सून? आणि कुटुंबाची व्याख्या यावर बरीच चर्चा झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ‘मॅट’चे उपाध्यक्ष जे.डी. कुलकर्णी यांनी शासनाचा १९९६ चा जीआर उचलून धरला. त्यात सुनेचा अधिकार सर्वात शेवटी येत असल्याचे नमूद आहे. अनुकंपा नोकरीसाठी सुनेला पात्र ठरवायचे की अपात्र याचा निर्णय शासनाने घ्यावा. परंतु कोणत्याही नोटीसशिवाय कविताची काढून घेतलेली नोकरी तिला परत द्यावी, या काळातील आर्थिक लाभही देण्यात यावे, असे आदेश २ फेब्रुवारी रोजी न्या. जे.डी. कुलकर्णी यांनी दिले. या खटल्यात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून श्रीमती ए.बी. कोलोलगी यांनी काम पाहिले.

नोटीस न देता नोकरीतून काढले कसे?
या मुद्यावर अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी ‘मॅट’मध्ये युक्तिवाद करताना मृत तनूबाईचा दुसरा मुलगा आधीच नोकरीत आहे तर विवाहित मुलींनी आम्हाला नोकरीत इन्टरेस्ट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सूनच वारसदार ठरत असल्याचे ‘मॅट’ला सांगितले. त्यावर कुटुंबाच्या व्याख्येचा अर्थ लावणे वादग्रस्त मुद्दा आहे. म्हणून हा निर्णय शासनालाच घेऊ द्या, असे स्पष्ट करीत ‘मॅट’ने कोणतीही नोटीस न देता नोकरीतून काढले कसे, या मुद्यावर भर दिला. कविताला आधी पूर्वपदावर सेवेत घ्या व नंतर तिच्या अनुकंपा नोकरीतील पात्रतेचा निर्णय घ्या, असा आदेश दिला.

सासू, पतीच्या निधनानंतर सून नोकरीत
प्रकरण असे की, तनूबाई (कविताच्या सासु) घोंगडे या वन खात्यात शिपाई पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या निधनानंतर अनुकंपा उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीत त्यांचा मुलगा संजय घोंगडे यांचे नाव होते. संजय यांना नोकरी देण्याबाबत कुटुंबातील अन्य वारसदारांनी सहमती दर्शविली होती. दरम्यान, प्रतीक्षा यादीत असतानाच विवाहित संजयचेही निधन झाले. त्यामुळे अनुकंपा तत्वावर त्याच्या पत्नीला नियुक्ती देण्यात आली. या काळात सामान्य प्रशासन विभागाने आक्षेप घेतल्याने कविताला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सासूच्या अनुकंपा नोकरीवर आधी दुसऱ्या मुलाचा-मुलीचा व नंतर सुनेचा अधिकार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

Web Title: Who is eligible for Claim for job; son in law or daughter-in-law? question for Mat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार