पोलीस महानिरीक्षकांचे निर्देश : पॅरोलवरील फरारींचा तत्काळ शोध घ्या यवतमाळ : संचित रजेच्या निमित्ताने कारागृहाबाहेर पडणाऱ्या मात्र नियोजित वेळेत परत न येणाऱ्या कैद्यांवर पोलिसांचा वॉच आहे. एवढेच नव्हे तर या कैद्यांना कारागृहातील हालचालींची इत्यंभूत माहिती देणाऱ्यांवरही पोलीस नजर ठेऊन आहेत. दरम्यान अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. उघडे यांनी पॅरोलवरील फरार कैद्यांना तत्काळ शोधून कारागृहात परत आणण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती विभागातील पाचही पोलीस अधीक्षकांंची बैठक नुकतीच अमरावतीत पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. उघडे यांनी यावेळी यवतमाळसह पाचही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नागपुरातील कैदी फरार झाल्याच्या घटनेच्या अनुषंगाने खास टिप्स् बैठकीत देण्यात आल्या. कारागृहांमधून कैदी संचित रजेवर जातात. मात्र परत येत नाहीत. अशा कैद्यांचा तत्काळ शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय जिल्हा पोलिसांना वॉन्टेड असलेल्या आरोपींचाही शोध घेण्याचे आदेश दिले गेले. मध्यवस्तीतील कारागृह धोकादायक यवतमाळ जिल्हा कारागृह हे शहराच्या अगदी मध्यभागी आहे. ब्रिटीशकाळात १८७२ ला स्थापन झालेले हे कारागृह तेव्हा सुरक्षित असले तरी आज मात्र धोकादायक आहे. या कारागृहाच्या सुरक्षेत अनेक त्रुट्या आहेत. मात्र शासन या त्रुट्यांच्या पूर्ततेसाठी कधीच लक्ष घालताना दिसत नाही. वास्तविक सुरक्षेच्या दृष्टीने हे कारागृह निर्जनस्थळी आवश्यक आहे. तेथून दोन किलोमीटरपर्यंत कोणतीही मानवी वस्ती नसावी, असे अपेक्षित आहे. (जिल्हा प्रतिनिधी) कैद्यांच्या बराकींची मध्यरात्री अकस्मात तपासणी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी पलायन प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा कारागृहात खास खबरदारी घेतली जात आहे. रात्री-अपरात्री अचानक कारागृहातील बराकींची तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर कारागृहाच्या चहूबाजूने रात्रभर गस्त केली जात आहे. नागपूर कारागृहातून पाच कैदी जेल तोडून फरार झाल्यानंतर राज्यातील सर्वच कारागृहांची यंत्रणा हादरली आहे. त्यातूनच सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे. यवतमाळ जिल्हा कारागृहात अशा घटनांना थारा नसला तरी कारागृह प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. मध्यरात्रीनंतर कोणत्याही क्षणी बराकींची, कैदी-न्यायाधीन बंंद्यांची तपासणी केली जाते. श्वान पथकाद्वारेही अंतर्गत तपासणी केली गेली. कारागृहाच्या मागील भिंतीकडून अंमली पदार्थाचा पुरवठा चेंडूद्वारे होत असल्याचा अनुभव लक्षात घेता मागच्या बाजूने रात्रगस्त वाढविली गेली आहे. ‘एमबीए’ परीक्षेसाठी कैद्याला सशर्त रजा यवतमाळ जिल्हा कारागृहात कोहिनूर सोसायटीतील एक तरुण न्यायाधीन बंदी आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत चोरीच्या आरोपात त्याला अटक केली गेली. दरम्यान त्याची एमबीएची परीक्षा असल्याने त्याने केळापूरच्या प्रथम श्रेणी न्यायालयात सुटीसाठी अर्ज केला. न्यायालयाने त्याच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून त्याला सशर्त रजा मंजूर केली. १० एप्रिल रोजी जिल्हा कारागृहातून त्याला सोडण्यात आले. परीक्षा संपल्यानंतर मेमध्ये तो न्यायालयाच्या निर्देशानुसार कारागृहात शरण येणार आहे.
कारागृहाच्या सुरक्षेवर ‘वॉच’
By admin | Updated: April 17, 2015 00:55 IST