आर्णी : समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या वस्तीशाळेतील उच्चश्रेणी शिक्षकांचे अजूनही वेतन झाले नाही. सलग सहा वर्षांपासून या शिक्षकांचा लढा सुरू आहे. आता १ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन निर्णय असूनही वेतन देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून अंमलबजावणीच करण्यात आली नाही. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी १४७ अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालये आश्रमशाळांना जोडण्यात आली. या महाविद्यालयांपैकी ३१ महाविद्यालये विदर्भात असून, २५ महाविद्यालये अमरावती विभागात आहे. या महाविद्यालयांमध्ये ११ हजार ८४० निवासी आणि १३ हजार १०७ अनिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतीगृह चालविण्यासाठी संस्थाचालकांनी शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळाले होते. विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना अजूनही वेतन देण्यात आले नाही. अनेक आंदोलने केल्यानंतरही उच्चश्रेणी शिक्षक वेतनापासून वंचित आहे. शासनाने २०१२ मध्ये २५ टक्के, ५० टक्के, ७५ टक्के आणि १०० टक्के अशा अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात अंमलबाजावणी केली नाही. त्यामुळे वसतीशाळेवर असलेल्या उच्चश्रेणी शिक्षकांवर आत्महत्यची पाळी आली आहे. उपजिवीकेचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वस्तीशाळा शिक्षक वेतनापासून वंचित
By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST