वणी : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसह जनहिताच्या काही मागण्या घेऊन विदर्भ राज्य जनआंदोलन समितीने रविवारी येथे कोळसा रोको आंदोलन केले. विदर्भ राज्य स्वतंत्रपणे देण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य जनआंदोलन समिती मागील दोन वर्षांपासून सतत आंदोलन करीत आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे साठे आहेत. या कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. मात्र ही वीज विदर्भाला न देता राज्यभर पूरविली जात असल्याने विदर्भावर अन्याय होतो. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली पाहिजे, जनतेचे वीज बिल निम्य करावे, विदर्भातील भारनियमन रद्द करावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा बॅकलॉग दूर करावा, १३२ के.व्ही.च्या नवीन वीज प्रकल्पाची मान्यत रद्द करावी, वीज मंडळाचे खासगीकरण बंद करावे, या मागण्यांसाठी जनआंदोलन समितीने आंदोलन पुरकारले होते. येथील टिळक चौकात ११ ते १ वाजेपर्यंत समितीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली येथे येऊन पोहोचली. टिळक चौकातून रॅली व कार्यकर्ते विविध घोषणा देत वरोरा मार्गावरील जगन्नाथ बाबा मंदिरात पोहोचले. तेथे माजी आमदार वामनराव चटप व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आंदोलक येथील रेल्वे साईडींग परिसरात पोहोचले. तालुक्यातील विविध कोळसा खाणीतून रेल्वे सायडिींगवर कोळसा भरून येणारे ट्रक आंदोलकांनी रोखून धरले. मात्र या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने कोळसा वाहतूक करणारे ट्रक खाणीमधून काढण्यात आले नसल्याने आंदोलकांना कोळसा वाहतूक ठप्प पाडण्यासाठी सोयीचे झाले. येथील पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांनी पूरेसा पोलीस बंदोबस्त लावल्याने आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनासाठी शेजारील जिल्ह्यांमधून शेकडो कार्यकर्ते आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भासाठी वणीत कोळसा रोको आंदोलन
By admin | Updated: October 26, 2015 02:22 IST