सातघरी तांडा : चार किलोमीटरची पायपीट करीत मोहदीत मतदानमहागाव : एकीकडे शहरी मतदार मतदानासाठी उदासीन दिसत असताना महागाव तालुक्यातील सातघरी येथील मतदार चक्क डफडे वाजवित मतदान केंद्रावर पोहोचले. एवढेच नाही तर मतदानासाठी त्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली. महागाव तालुक्यातील मोहदी गट ग्रामपंचायती अंतर्गत सातघरी तांडा येतो. बंजाराबहुल या गावातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत बुधवारी चांगलीच जाणीव दिसून आली. एखाद्या सण-समारंभाला जावे तसे येथील बंजारा बांधव डफडे वाजवित मोहदीच्या मतदान केंद्रावर पोहोचले. सकाळी १० वाजता शेकडो महिला-पुरुष सातघरी येथून डफडे वाजवित मतदान केंद्रावर पोहोचले. यासाठी गावातील दामू गोबरा जाधव या तरुणाने पुढाकार घेतला होता. डफडे वाजवित मतदान केंद्रावर पोहोचलेले सातघरीचे मतदार सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र झाले होते. पुसद विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या गावात मतदानाबद्दल प्रचंड जागरुकता असून येथील गावकऱ्यांनी जणू लोकशाहीचा उत्सवच साजरा केल्याचे दिसत होते. मात्र सातघरीपासून मोहदी हे मतदान केंद्र चार किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक वृद्ध मतदारांना त्रास सहन करावा लागला. सातघरी येथेच मतदान केंद्र देण्याची मागणी दामू जाधव यांच्यासह सरपंच ललिता खराटे, उपसरपंच मदन राठोड आणि नागरिकांनी केली. (शहर प्रतिनिधी)
डफडे वाजवीत बंजारा बांधव पोहोचले मतदान केंद्रावर
By admin | Updated: October 15, 2014 23:24 IST