अभाव : कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : नागरिकांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना अंमलात आणल्या आहे. परंतु या योजनांची माहिती खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे लाभार्थी योजनांपासून अनभिज्ञ दिसत आहेत. दिग्रस तालुक्यातील कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने या लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. तालुक्यातील रुई तलाव, आरंभी, चिरकुटा, वसंतनगर, कोलुरा, फेट्री, लाखरायाजी, झिरपूरवाडी, फुलवाडी या बंजाराबहुल गावांमध्ये शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्याच नाही. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना, अपंग निवृत्ती वेतन योजना अशा महत्त्वपूर्ण योजनांपासून शेकडो लाभार्थी वंचित आहेत. या योजनांचा लाभ काही मोजकेच लोक घेताना दिसत आहे. इतर सर्वसामान्य जनतेला या योजनांची माहिती दिली जात नाही. तलाठी आणि ग्रामसेवक मुख्यालयी राहात नसल्याने लोकांपर्यंत योजनांची माहितीच पोहोचत नाही. योजनेची माहिती झाल्यास लाभार्थ्याची टोलवाटोलवी केली जाते. शासन एकीकडे योजनांवर कोट्यवधी खर्च करीत आहे. परंतु खरे लाभार्थी योजनांपासून दूर दिसत आहे. वृद्ध निराधारांचे हाल पोटच्या गोळ्याने दुर्लक्षित केल्याने आज अनेक वृद्ध उपेक्षितांचे जीणे जगत आहे. अशांसाठी शासनाच्या योजना आहे. त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून निवृत्ती व निराधार योजना राबविली जाते. परंतु दिग्रस तालुक्यातील अनेक वृद्ध निराधारांना या योजनांची माहितीच नाही. त्यामुळे ही मंडळी दुसऱ्याच्या आश्रयाने अथवा भिक्ष्या मागून जगताना दिसत आहे.
दिग्रसमध्ये लाभार्थी योजनांपासून अनभिज्ञ
By admin | Updated: June 10, 2017 01:10 IST