घाटंजी : शहरात लागोपाठ झालेल्या दोन घटनांमुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली. सोमवारी सायंकाळी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांशी विहिरीच्या मान्यतेवरून मनसे पदाधिकाऱ्यांने वाद घातला. यानंतर ग्रामपंचायतीच्या नामांकनासाठी जात वैधता प्रमाणपत्र स्वीकारण्यावरून तहसील कार्यालयात वाद झाला. यावरून जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार आणि माजी नगरसेवक सतीश मलकापुरे या दोघांचे गट आमने-सामने आले. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घाटंजीचे गटविकास अधिकारी उत्तम मानकर कक्षात बसले असताना मनसेचे पदाधिकारी प्रशांत धांदे यांच्या सहकाऱ्यांनी खचलेल्या विहिरी प्रस्तावांना मान्यता देण्यावरून वाद घालत जातीवाचक शिविगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायत समितीतील हा प्रकार मिटतोनमिटतो तो तहसील कार्यालयात ग्रामपंचायत नामांकनासोबत जात पडताळणी प्रमाणात दाखल करण्यावरून जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार व माजी नगरसेवक सतीश मलकापुरे यांच्यात वाद झाला. त्यानंतर रात्री ९ वाजता या दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. देवानंद पवार यांच्या समर्थकांनी मलकापुरे यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली व एकूण पाच लाखांचा मुद्देमाल पळवून नेला अशी तक्रार सतीश मलकापुरे यांनी दिली. दोन्ही गटातील समर्थक रस्त्यावर उतरल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बंदोबस्त लावून परिस्थती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, साहेबराव पवार, शैलेश इंगोले, शंकर काकडे, अशोक पवार, अनिल एंबडवार, नरसिंग पवार सह १३ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. देवानंद पवार यांच्या तक्रारीवरून सतीश मलापुरे, वैभव मलकापुरे, भरत दलाल यांच्यावर लुटपातीचा गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे भरत दलाल यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार यांच्यावर लुटपातीचा गुन्हा दाखल केला. (लोकमत चमू)
घाटंजीत मारहाणीच्या दोन घटना
By admin | Updated: April 8, 2015 02:16 IST