लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन (आयपीएस) यांना अॅट्रोसिटी व पोक्सोच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास व अपराधसिद्धीसाठी आठ हजारांचे बक्षीस (रिवार्ड) देण्यात आले आहे. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या बक्षीसाची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांना नुकतीच केली आहे.नुरुल हसन नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यांनी उमरी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल अॅट्रोसिटी व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा भक्कम तपास केला. त्यामुळे अपराधसिद्धी शक्य झाली. त्यांचा हा तपास आॅगस्ट २०१९ या महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपास ठरला. त्या अनुषंगाने नुरुल हसन यांना आठ हजाराचे बक्षीस व प्रमाणपत्राची शिफारस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सीआयडीकडे केली. उपरोक्त तपासासाठी एकूण २५ हजारांच्या बक्षिसाची शिफारस केली गेली. ही रक्कम धर्माबादचे एसडीपीओ अभय देशपांडे, उमरीचे फौजदार ज्ञानेश्वर शिंदे व धर्माबादचे पोलीस शिपाई दिगांबर शितळे यांना विभागून दिले जाणार आहे.
अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हे तपास ठरला सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST