उमरखेड : शेतात गव्हाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला केला. शेतकऱ्याने हिमतीने वाघाचा प्रतिकार केला. सुमारे अर्धातास वाघ आणि शेतकरी आमने सामने उभे होते. या बाका प्रसंगातही त्याने मोबाईलवरून गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी शेतात धाव घेत वाघाला हुसकावून लावले. ही घटना उमरखेड वन परिक्षेत्रातील मरसूळ येथे शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. प्रकाश नागोबा सुरोशे (५४) रा.मरसूळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उमरखेड वन परिक्षेत्रात गेल्या आठ दिवसात कृष्णापूर, तिवडी, मरसूळ, गोणीपूर या गावातील अनेक जनावरे वाघाने फस्त केली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. मरसूळ गावालगतचे शेत प्रकाशने भागिदारीने केले आहे. गव्हाला पाणी देत असतानाच वाघाने त्यांच्यावर झडप घातली. त्याने बोरीच्या फाट्याने वाघाचा प्रतिकार केला. पण चवताळलेला वाघ त्याचा पाठलाग करीत होता. तो बाजूच्या एका झुडुपात शिरला. हीच संधी साधून प्रकाशनेही दुसऱ्या झुडुपात धाव घेऊन गावकऱ्यांना मोबाईलवरून मदतीसाठी बोलविले आणि आपला जीव वाचविला. (शहर प्रतिनिधी)
वाघ अन् शेतकरी अर्धातास आमनेसामने
By admin | Updated: February 28, 2016 02:28 IST