किशोर वंजारी नेरवय केवळ तीन वर्षे. कुटुंब अतिशय सामान्य. आईला अक्षर ओळखही नाही. अशा कुटुंबातील चंदनची बुद्धीमत्ता अचंबित करणारी आहे. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ त्याला मूकपाठ आहे. शिवाय कुठलाही प्रश्न विचारा त्याचे उत्तर तयार आहे. तालुक्यातील शहापूर येथील चंदन देवीदास शिंदे याच्या या अफाट बुद्धिमत्तेचे कौतुकच नव्हे तर कुतूहलही आहे. चंदनचे वडील देवीदास शिंदे यांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झालेले. त्यांची पत्नी मनकर्णा अशिक्षित आहे. कुकर, मिक्सर, स्टोव दुरुस्तीचे काम करून उपजीविका चालविणाऱ्या देवीदास यांचा मुलगा चंदन मात्र अफाट बुद्धिमत्तेचा आहे. दूरचित्रवाहिनीवरील केवळ बातम्या तो पाहतो. चिकित्सक वृत्तीच्या चंदनची ग्रहण क्षमताही अचंबित करणारी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान कोण, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मृत्यू कशामुळे झाला, उद्धव ठाकरेंच्या आईचे नाव, पत्नी, मुलाचे नाव अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे तो सहजरीत्या देतो. महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या, कोणता जिल्हा मोठा आणि कोणता लहान याची अचूक माहिती त्याला आहे. तल्लख बुद्धीच्या चंदनचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र घरातील अठराविश्व दारिद्र्यामुळे त्याच्या विकासाला चालना मिळत नाही. त्याला सामाजिक आणि आर्थिक आधाराची गरज आहे.
तीन वर्षांचा चंदन देतोय फटाफट उत्तर
By admin | Updated: March 14, 2015 02:15 IST