पुसद : बोचऱ्या थंडीत तीन चिमुकल्यांना रस्त्याच्या कडेला बेवारस सोडून एका निर्दयी मातेने पलायन केले. ही घटना पुसद शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली. ही बाब न्यायदंडाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण करून त्या तीन चिमुकल्यांना मायेची ऊब देत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या घटनेने त्या मातेबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत असून माता न तू वैरिणीची प्रचिती येत आहे.सहा वर्षे, चार वर्षे आणि दीड वर्षे या वयोगटातील ही भावंडे आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मातेने या चिमुकल्यांना पुसद शहर पोलीस ठाण्यासमोर बेवारस सोडून दिले. तसेच संधी साधून तेथून पलायन केले. त्यानंतर या चिमुकल्यांनी आपल्या मातेचा शोध घेतला. बराच वेळ वाट बघितली. त्यानंतर मात्र छोटी भावंड भुकेने व्याकुळ झाली. यावेळी सहा वर्षीय मोठ्या बहिणीने चक्क भिक्षा मागून या दोघांना खाऊ घातले. एवढेच नव्हेतर दोन रात्री त्यांनी उघड्यावरच काढल्या. हा घटनाक्रम अनेकांच्या डोळ्यात भरला. परंतु कुणीही त्यांची मदत केली नाही. दरम्यान, बुधवारी काही कामानिमित्त येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे तेथे आले. यावेळी ही चिमुकली त्यांच्या दृष्टीस पडली. त्यांनी या चिमुकल्यांना गोंजारून चौकशी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्यांना सोडून त्यांच्या मातेने पलायन केल्याचे सांगितले. तेव्हा न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे हे क्षणभर स्तब्ध झाले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पुसद शहरचे ठाणेदार रमेश सोनुने यांना दिली. त्यावरून तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मुलांना खाद्यपदार्थ दिले. त्यानंतर त्यांची आंघोळ घालून स्वच्छ कपडेही दिले. त्यानंतर या चिमुकल्यांना एका अनाथालयात हलविले. या चिमुकल्यांना शुक्रवारी बालकल्याण मंडळापुढे हजर केले जाणार आहे. त्या मातेने असे का केले, हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही. मात्र पोलिसांनी तिचा शोध चालविला आहे. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या सजगतेचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
तीन चिमुकल्यांना बेवारस सोडले
By admin | Updated: December 18, 2014 02:19 IST