यवतमाळ : मोबाईल डेटा हॅक करून ४९ लाख रुपये बँक खात्यातून परस्पर वळविल्याच्या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी कोलकात्यामध्ये रविवारी आणखी तिघांना अटक केली. सम्राट शेख ऊर्फ राज दास, उज्ज्वल घोष व सागर माहातो सर्व रा. कोलकाता, अशी त्यांची नावे आहेत. या टोळीचे आणखी आठ ते दहा सक्रिय सदस्य कोलकात्यामध्ये दडून आहेत. त्यांचा शोध यवतमाळ पोलिसांकडून तेथे सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे, सुरेश कांबळे, इकबाल शेख, अरविंद चौधरी आदींचे पथक कोलकात्यात तळ ठोकून आहे. रविवारी अटक केलेल्या तिघांच्या नावाने आयसीआयसीआय बँकेत खाते असल्याचे आढळून आले. यवतमाळात अटक असलेले कृष्णकुमार व त्याचे दोन साथीदार आमचे नातेवाईक असल्याने आम्ही त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड ही कागदपत्रे दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या तिघांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वळविली गेल्याचे सांगण्यात येते. या टोळीचा म्होरक्या आर.के. आणि अमजद हे नागपुरात अटक आहेत, हे विशेष. सागर हा नायजेरियनसह कोलकाता येथील सदस्यांचा ‘म्होरक्या’ व आश्रयदाता असल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)
कोलकात्यात आणखी तिघांना अटक
By admin | Updated: October 19, 2015 00:16 IST