लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पांढरकवडा रोडवरील मालाणी बाग परिसरातील बियाण्याचे गोदाम फोडून चोरट्याने तीन लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. वडगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाने अवघ्या २४ तासांत चोरीतील मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतले. प्रदीप श्रीराम ओमनवार, यांचे येथील दत्त चौकात कृषी केंद्र आहे. त्यांनी बियाण्यांचा साठा करण्यासाठी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदाम भाड्याने घेतले. बियाणे आणण्यासाठी ओमनवार यांनी त्यांचा नोकर अमोल मादेश्वर याला शुक्रवारी गोदामावर पाठविले असता चोरी झाल्याचे आढळून आले. चोरट्यांनी टीन कापून दुकानात प्रवेश केला. शोध पथकाने गुन्हा दाखल होताच गोपनीय माहितीवरून संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर आर्णी येथील विजय चव्हाण (३५) याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंदिरानगरातील शाहीद खान, आरिफ खान, शेख फिरोज यांनी आणखी काही सहकाऱ्यांच्या मदतीने टीन कापून बियाण्याची चोरी केली. त्यानंतर हा माल एका टाटा एसमध्ये भरून आर्णीला नेला. तेथे विजय चव्हाण याच्याकडे हा माल ठेवण्यात आला. या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले असून मुद्देमाल व एम.एच.०१/डी.ए.३५०४ क्रमांकाची कार पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई एसडीपीओ पीयूष जगताप व ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, ऋतुराज मेडवे, गौरव नागलकर, अन्सार बेग, रावसाहेब शेंडे, आशीष चौबे, सुधीर पुसदकर आदी कर्मचाऱ्यांनी केली. आरोपींकडून इतरही दुकानफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
तीन लाखांची चोरी २४ तासांत उघड
By admin | Updated: July 2, 2017 01:19 IST