लाचेची रक्कम : न्यायालयाचा निकाल लागला, शिक्षाही झाली किशोर वंजारी - नेरमोठे धाडस करून बँक व्यवस्थापकाला लाच घेताना पकडून दिले. मात्र यासाठीची रक्कम रुपये दोन हजार परत मिळविण्यासाठी तालुक्याच्या माणिकवाडा येथील विजय सरडे या शेतकऱ्याला धडपड करावी लागत आहे. सीबीआयने पकडलेल्या या अधिकाऱ्याला दोन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा झाली असली तरी या शेतकऱ्याचे मात्र दोन हजार रुपये अडकले आहे.मांगलादेवी येथील युनियन बँकेकडे विजय सरडे या शेतकऱ्याने २००८ मध्ये पीक कर्जासाठी अर्ज केला होता. हे कर्ज मंजूर करण्यासाठी बँक व्यवस्थापक सुनील जनार्दन मेश्राम याने दोन हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, सरडे यांनी या प्रकाराची तक्रार सीबीआयच्या नागपूर विभागाकडे केली. सापळा रचून या व्यवस्थापकाला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले. याप्रकरणात व्यवस्थापकाला पाच वर्षानंतर दोन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. व्यवस्थापकाला लाच देण्यासाठी वापरलेले दोन हजार रुपये प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर परत केले जाईल, असे सरडे यांना सांगण्यात आले होते. निकाल लागून जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही त्याला रक्कम मिळाली नाही. सीबीआयचे अधिकारी त्याला केस क्रमांक द्यायला तयार नाही. उलट त्याला मानसिक त्रास दिला जात आहे. मोठ्या धाडसाने त्याने एका मोठ्या अधिकाऱ्याला पकडून दिले. मात्र शासनातीलच अधिकाऱ्यांच्या नकारार्थी धोरणामुळे त्याला मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे विजयने एका ग्रामसेवकालाही लाच घेताना पकडून दिले आहे. लाचखोरांना धडा शिकविण्यासाठी त्याने उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार याच अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. रक्कम परत मिळावी, अशी मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे.
सीबीआय ट्रॅपमधील दोन हजारांसाठी धडपड
By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST