नेर : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात तीन इसमांनी धुडगूस घालून वैद्यकीय अधीक्षकांना शिवीगाळ करीत कक्षाची तोडफोड केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसात तक्रार देऊनही आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पुन्हा याच आरोपींनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरवर हल्ला केला. नेर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात विजय उम्रतकर व त्याचे दोन सहकारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरले. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय जाधव यांच्या कक्षाची तोडफोड करीत शिवीगाळ केली. हा धुडगूस पाहून डॉ.जाधव घरी गेले. घरी जाऊन या दोघांनी पुन्हा शिवीगाळ केली. यानंतर डॉ.जाधव यांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र त्यांना अटक करण्यात आली नाही. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पुन्हा तेच आरोपी ग्रामीण रुग्णालयात गेले त्यांनी शिवीगाळ करीत डॉक्टर जाधव यांच्यावर हल्ला केला. या प्रकाराने घाबरलेले डॉक्टर आणि कर्मचारी नेर पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुन्हा नेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या तिघांनी धुडगूस का घातला हे मात्र कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)
नेर ग्रामीण रुग्णालयात तिघांचा धुडगूस
By admin | Updated: January 29, 2015 23:13 IST