सरपंचाची तक्रार : चौकशी करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराकळंब : तालुक्यातील रुढा ते खोरद या रस्त्यावर नुकतेच डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार आला. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषण आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा सरपंच नितीन जयस्वाल व गावकऱ्यांनी दिला आहे. रुढा ते खोरद या रस्त्याचे डांबरीकरण जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ अंतर्गत करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण असले तरी या रस्त्यावर डांबर शोधुनही सापडणे कठिण आहे. डांबरामध्ये जळालेले(काळे) आॅईल टाकून रोडचे काम करण्यात आल्याचे दिसून येते. गिट्टी विहिरीवरील बांधकामाची वापरण्यात आली आहे. त्यामुळे तीसुद्धा निकृष्ठ दर्जाची आहे. रस्ता बांधकामाच्यावेळी संबधित कंत्राटदार व शाखा अभियंत्यांना गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी कामाच्या गुणवत्तेविषयी वारंवार तक्रारी केल्या. परंतु त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी ठोकर मारल्यानंतरही गिट्टी उखडल्या जाते, अशी या रोडची अवस्था आहे. यापूर्वी येथील सरपंच व गावकऱ्यांनी या रोडच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. परंतु कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी थातूरमातूर चौकशी करून ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्यावतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. उल्लेखनिय म्हणजे सदर काम हे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या मतदार संघातील आहे. त्यानंतरसुद्धा या कामात कमालीचा हलगर्जीपणा करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या रस्त्याच्या दुर्दशेबाबतची माहिती एका निवेदनाद्वारा जिल्हा परिषद अध्यक्षांनाही दिली आहे. अधिकारी वर्गाकडून कंत्राटदाराना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
डांबरी रस्त्यावर डांबरच नाही
By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST