लॉकडाऊनमधील कलेक्शनच्या खर्चाचा हिशेबच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:24+5:30

या मंडळात किमान ५१०० रूपयांपासून ८१ हजारांपर्यंत दानदात्यांनी प्रत्येकी वर्गणी दिली. सुरुवातीला दररोज कुणी किती रक्कम दिली याची यादी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर जाहीर केली जात होती. नंतर ही यादी पाठविणे बंद झाले. एकूण कलेक्शन किती आणि खर्च किती झाला हे सांगणे मात्र टाळले गेले. या कार्यकर्त्यांचे कलेक्शन ३० लाखांच्या घरात तर खर्च अर्धाही झाला नसल्याचे बोलले जाते.

There is no calculation of the cost of collection in lockdown | लॉकडाऊनमधील कलेक्शनच्या खर्चाचा हिशेबच नाही

लॉकडाऊनमधील कलेक्शनच्या खर्चाचा हिशेबच नाही

Next
ठळक मुद्देवसुली मोठ्या प्रमाणात : काहींची ‘सेवा’ ठरली ‘दुकानदारी’, हिशेबावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात गरजू व गोरगरिबांना मदत वाटपासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पीक आले होते. यातील काहींनी या सेवेच्या नावाने मोठी वसुली केली. परंतु त्याच्या खर्चाचा कुणाकडे हिशेबच नाही. अशाच हिशेबावरून एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. तिजोरीच्या चाब्या सांभाळणाऱ्या ज्येष्ठाला मारहाण करण्यापर्यंत हा वाद पोहोचला.
लॉकडाऊनमध्ये पुणे लुटून साताऱ्याला दान करण्याचे प्रकार विविध ठिकाणी पहायला मिळाले. शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठीतांकडे कुणी कॅश तर कुणी वस्तू स्वरूपात मदत मागितली. ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविली गेली. बहुतेकांनी प्रामाणिकपणे आणि सामाजिक भान ठेऊन हे काम केले असले तरी काही संधीसाधूंनी मात्र या सेवेच्या नावाने दुकानदारी थाटली होती. ‘कलेक्शन खूप आणि खर्च कमी’ असा हा सारा प्रकार होता. कोणकोणत्या ठिकाणांवरून आणि नेमके किती कलेक्शन केले गेले याचा हिशेब वसूलीकर्त्याच्या निकटवर्तीय निवडक दोन-चार जणांनाच माहीत. त्यामुळे प्रत्यक्ष वाटप करणारे अनेक जण त्यापासून अनभिज्ञच. ही समाजसेवा कलेक्शन आटल्याने व नवे देणारे कुणी नसल्याने सध्या थंडावली आहे. लॉकडाऊन संपायला आल्याने अनेक ठिकाणी आता कलेक्शन किती आणि खर्च किती, शिल्लक किती याचा हिशेब जुळविला जाऊ लागला आहे. मात्र याच हिशेबावरून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिणगी पडली. तेथे आता दोन गट पडले आहेत.
या मंडळात किमान ५१०० रूपयांपासून ८१ हजारांपर्यंत दानदात्यांनी प्रत्येकी वर्गणी दिली. सुरुवातीला दररोज कुणी किती रक्कम दिली याची यादी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर जाहीर केली जात होती. नंतर ही यादी पाठविणे बंद झाले. एकूण कलेक्शन किती आणि खर्च किती झाला हे सांगणे मात्र टाळले गेले. या कार्यकर्त्यांचे कलेक्शन ३० लाखांच्या घरात तर खर्च अर्धाही झाला नसल्याचे बोलले जाते. विशेष असे, समाज बांधवांनी गुप्त पद्धतीने केलेल्या दानाचा तर कुठे हिशेबच नाही. दानदात्यांना खर्चाची विभागणी दाखविता यावी म्हणून सॅनिटायझर फवारणी, दूध, भाजी, किट वाटप अशा वेगवेगळ्या मार्गाने ‘सेवा’ दाखविली गेली.
नेर व केळापूरात फवारणी
यवतामाळात अनेक भागात फवारणी पोहोचली नसताना केवळ राजकीय नेत्यांना खूष करण्यासाठी नेर व केळापूर येथे जाऊन फवारणी केली गेली. या मंडळाची तिजोरी सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठाने आतापर्यंतचे कलेक्शन किती आणि खर्च किती याचा हिशेब जुळविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या वयाचे भान न ठेवता प्रमुख कार्यकर्त्याने त्या ज्येष्ठाला मारहाण केली. रेशनच्या धान्याची काळा बाजारी करणाºयाने ज्येष्ठावर हात उचलणे समाजातील अनेकांना रुचले नाही. त्यामुळे या कृत्यावरून संतप्त प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहे.

भवनातील ‘डान्स’ व्हायरल, सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैसी
या कार्यकर्त्यांचा भवनात कायमच धुमाकूळ चालतो. नुकताच हातात दारूच्या बॉटल घेऊन सोशल डिस्टन्सिंगची वाट लावत केलेल्या डान्सचा व्हीडीओ दोन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. जबाबदार व्यक्तीच हातात दारूची बॉटल घेऊन नाचताना दिसत आहे. जुगार खेळणे, नागपूरवरून ‘पार्सल’ बोलविणे असे प्रकारही तेथे चालत असल्याची चर्चा आहे. खेळणाऱ्यांची वाहने इतरांच्या घरासमोर तासन्तास लावली जात असल्याने भवन परिसरातील रहिवासी त्रस्त आहे. या भवनाच्या वार्षिक जमा खर्चाचा हिशेब लागत नसल्याने व कायमच तोटा दिसत असल्याने समाज बांधवही कारभारावर नाराज आहेत. या भवनाला विशिष्ट गटाने घातलेला विळखा सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजसेवेच्या नावाखाली या कार्यकर्त्यांनी डान्स करून संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंगला आव्हान दिल्याने त्यांच्यावर कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरते.

Web Title: There is no calculation of the cost of collection in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.