रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कोलमडले आहे. किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे. यातूनच बियाणे विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर दोन कोटी पॅकेटस् (प्रत्येकी ४७५ ग्रॅम) कपाशी बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. खरीप हंगामाला वेळ असला तरी बियाण्यांची नोंदणी तीन ते चार महिने आधीच करावी लागते. त्या दृष्टीने बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या बाजारपेठेतून मागणी नोंदवत आहे. त्यानुसार कंपन्या धोरणही ठरवीत आहे. सध्या याच पद्धतीने येणाऱ्या काळात कुठल्या बियाण्यांची मागणी अधिक राहील यानुसार नोंदणी केली जात आहे.
कापूस उत्पादक प्रांतावर विक्रेत्यांच्या नजरा
- संपूर्ण राज्यात ३३० कंपन्या बियाण्यांची विक्री करतील. सुमारे दोन कोटी पॅकेटस् बियाणे लागतील. त्यानुसार याची नोंदही करण्यात येत आहे. कापूस उत्पादक प्रांत म्हणून विदर्भाकडे पाहिले जाते.
- या ठिकाणी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये १५ ते २० टक्के क्षेत्र कापसाखाली अधिक येण्याची शक्यता नियोजन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार कंपन्यांकडे बियाण्याची नोंदणी केली जात आहे.
मक्याचे क्षेत्र वाढणारविदर्भात मका लागवड होत नसला तरी याचे उत्पादन अधिक होत असल्याने शेतकरी मका लागवडीकडे वळण्याची शक्यता आहे. यातून मक्याच्या बियाण्यांची मागणी विक्रेत्यांकडून नोंदविली जात आहे. एक नवे पीक विदर्भात पाहायला मिळणार आहे. याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी होत असल्याने याला चांगला दर राहण्याची शक्यता आहे. संरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मोठी व्यवस्था करावी लागणार आहे.
तुरीचे क्षेत्र वाढेल; सोयाबीनचे मात्र घटेलयेणाऱ्या हंगामात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. त्या दृष्टीने आंतरपीक म्हणून शेतकरी तुरीच्या बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. दुसरीकडे सोयाबीनचे दर कमालीचे घसरले आहेत. यामुळे येणाऱ्या हंगामात सोयाबीनचा पेरा १५ ते २० टक्क्याने कमी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.