लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुकानात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई नाकारणे आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला चांगलेच भोवले. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने याप्रकरणी तक्रारकर्त्याला विम्याचा लाभदेण्यात यावा, असा आदेश देत इन्शुरन्स कंपनीला चपराक दिली.
येथील संदीप बाबाराव निनगुरकर यांच्या स्थानिक आर्णी रोडवर असलेल्या दुकानात २३ जुलै २०२० रोजी पाणी शिरले होते. यामुळे दुकानातील कॉम्प्युटर, प्रिंटर, प्लाय, सनमायका काउंटर, मिक्सर, इंडक्शन कॉईल, किचनवेअर, प्लास्टिक वस्तू, बिल बुक, रिसिप्ट बुक आदी वस्तू खराब झाल्या. संदीप निनगुरकर यांनी व्यवसायासाठी दि अकोला जनता कमर्शिअल को-ऑप. बैंक लि. यवतमाळ यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्यावेळी बँकेने आयसीआयसीआयकडे विमा पॉलिसी काढण्याची अट ठेवली होती. त्यामुळे दोन हजार ४८२ रुपयांचा भरणा करून आठ लाख रुपये मूल्यांचे संरक्षण मिळाले होते. दुकानातील वस्तूंचे नुकसान झाल्याने त्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डकडे भरपाईची मागणी केली होती, परंतु ती नाकारण्यात आली. सूचना मिळाल्यानंतर विमा कंपनीचे सर्वेअर तब्बल १५ दिवसांनी तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी दुकानात अर्धा ते एक फूट पाणी साचलेले दिसून आले होते. ही बाब त्यांच्या अहवालात नमूद असूनही विमा कंपनीने नुकसानभरपाई नाकारल्याने ग्राहक आयोगाने हस्तक्षेप करून तक्रारकर्त्याच्या बाजूने निर्णय दिला.
भरपाई नाकारणे अनुचित प्रथा
खराब झालेल्या वस्तू १ सांभाळून ठेवल्या नाही, या सबबीखाली आयसीआयसीआय लोम्बार्डने भरपाई नाकारणे, ही अनुचित प्रथा असल्याचे ग्राहक आयोगाने निकालपत्रात नमूद करत निर्णय दिला. विमा कंपनीने संदीप निनगुरकर यांना २० हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे.
माहिती देऊनही दुर्लक्ष केले
पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने झालेल्या नुकसानीची माहिती संदीप निनगुरकर यांनी विमा कंपनीला दिली. त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय, भरपाईही नाकारली. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये संदीप निनगुरकर यांची बाजू अॅड. आर. डी. सोनटक्के यांनी मांडली.