यवतमाळ : अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत जिल्ह्यात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. या महिला गरीब कुटुंबातील असून, आज त्यांच्यापुढे उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. अंगणवाडी सेविकांना वेळेवर मानधन न मिळाल्याने त्याचा कामावरही परिणाम होत आहे. सेवानिवृत्तीचा लाभ सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात आलेला नाही. १ एप्रिल २०१४ पासून राज्यशासनाने आंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली. मात्र या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. वारंवार मागणी करूनही वाढीव मानधन देण्यात आलेले नाही. याप्रमाणेच अंगणवाडी सेविकांना २०१४ मध्ये भाऊबीज भेटीची रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही. यवतमाळ प्रकल्पात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून टीए, डीएची रक्कम देण्यात आलेली नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी स्वत:जवळचे पैसे खर्च करून योजनांच्या कामाचे नियोजन केले. आता या कर्मचाऱ्यांना स्वत:चे पैसे मिळविण्यासाठी शासनाकडे तगादा लावावा लागत आहे. शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कुठलेही स्टेशनरी साहित्य दिले जात नाही. रजिस्टर, अहवाल अर्ज या सारख्या स्टेशनरी साहित्याची कर्मचाऱ्यांची खरेदी करावी अशी सक्ती केल्या जात आहे. याविरोधात आंगणवाडी सेविका मदतनिसांनी जिल्हा परिषदेच्या आवारात थाळीनाद आंदोलन करुन आले निवेदन महिला बाल व कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. मरसाळे यांना दिले. या मोर्चाचे नेतृत्व कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ, सरचिटणीस ज्योती कुलकर्णी, अरुणा अलोणे, नंदकिशोर देशमुख, राजू लोखंडे, कौसल्या बेलखेडे, माला क्षीरसागर, माया पवार, गंगा वाघमारे, प्रज्ञा जोशी, हुकुमताई ठमके, सुशीला पळवेकर, अनसूया थेरे आदी उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन
By admin | Updated: January 29, 2015 23:15 IST