अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने घरातच बसावे असे सक्त निर्देश आहे. मात्र ही संचारबंदी तंतोतंत पाळणे गोरगरिबांच्या वस्त्यांना जड जात आहे. यवतमाळातील अनेक स्लम वस्त्यांमध्ये नागरिकांना नाईलाजाने काही तास तरी घराबाहेर निघावेच लागत आहे. बाहेर कोरोनाची धास्ती, सोबतच पोलिसांच्या दंडुक्याची भीती तर घरात आश्रयासाठी अपुरी जागा या परिस्थितीमुळे हजारो नागरिकांच्या मनाचे द्वंद्व सुरू आहे.यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घेऊन घरी आहे. कुणाचे घर टोलजंग नसले तरी किमान चार लोकांचा निर्वाह होऊ शकेल इतके सुटसुटीत आहे. मात्र स्लम वस्त्यांमध्ये अशी परिस्थिती नाही.प्रामुख्याने यवतमाळातील गवळीपुरा, पाटीपुरा, नेताजीनगर, उमरसरा परिसर, इंदिरानगर, अंबिकानगर, अशोकनगर, पॉवर हाऊस परिसर, धोबी घाट, कुंभारपुरा, पिंपळगाव परिसर, वाघापूर टेकडी परिसर, लोहारा, तारपुरा, भोसा आदी परिसरातील अनेक वस्त्या अत्यंत कोंदट आहेत. रस्ते म्हणजे चिंचोळ्या आणि अरुंद बोळीच आहेत. या गल्लीबोळांच्या काठावर एकमेकांना चिकटलेली घरे आणि त्यात दाटीवाटीने राहणारी कष्टकऱ्यांची कुटुंबे सामान्य परिस्थितीतही मोकळा श्वास घेण्यासाठी तडफडत असतात. आता तर संचारबंदीने घराचे दार लावून आत बसण्याची वेळ आली आहे. दिवसभर मिळेल ते काम करणे आणि रात्री कसाबसा खोलीत आसरा घेणे, हे जीवनचक्र सध्या अवरुद्ध झाले आहे. अडखळले आहे. बाहेर निघण्याची परवानगी नाही अन् आत बसून राहण्याची सोय नाही... गुदमरणार नाही तर काय?मरणाचे भय तुम्हा-आम्हाला आहे, तसे या स्लम वस्तीतल्या नागरिकांनाही आहेच. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तेही सजग आहेतच. पण पाच-सहा जणांचे कुटुंब, त्यात लेकरांचा गलबलाट, तेथेच स्वयंपाक, तेथेच धुणी-भांडी, तेथेच अंथरूण... अशी जत्रा एका छोट्याशा खोली वजा घरात कोंबून टाकलेले हे जीवन सतत बाहेरच्या जगाकडे आशाळभूतपणे बघत असते. या वस्त्याच शेजाऱ्यांच्या साथीने जगणाऱ्या. चहापत्ती संपली, कणिक संपली की माग शेजाºयाला.. मग दुसºया दिवशी मजुरी मिळाली की नेऊन दे परत, हे येथील रीत. घरातली जागा अपुरी म्हणून या नागरिकांचा अर्धा संसारच अंगणात, रस्त्यावर. पण कोरोनाची संचारबंदी या गोष्टींना पायबंद घालणारी आहे. नाईलाज म्हणून अनेकांना घराबाहेर रस्त्यावर काही तास तरी घालवावेच लागतात, तेव्हाच घराचा श्वास मोकळा होतो. पण त्यामुळे संचारबंदीचा नियम मोडला जातो अन् पोलिसांचा फटका बसतो. संचारबंदीचे पालनही महत्त्वाचेच अन् या गरिबांचे घराबाहेर निघणेही अपरिहार्यच... आता १४ एप्रिलपर्यंत हा कोंडमारा चालणार आहे.काही टोळक्यांचा जाणीवपूर्वक उच्छाददरम्यान, याच वस्त्यांच्या आडोशाने काही टवाळखोर तरुणांचे टोळके संचारबंदीचे जाणीवपूर्वक वाटोळे करताना दिसतात. मुद्दाम चौकात बसून असतात. तंबाखू, खºर्यांची गुपचूप विक्री करणारेही यातच सामील झालेले आहेत. मात्र अशा ठिकाणांवर पोलिसांचे वाहनही क्वचित चक्कर टाकून परत जाते. संचारबंदी नव्हे पण कोरोना टाळण्यासाठी तरी अशा टोळक्यांवर जरब बसविण्याची गरज आहे.मरणारच आहो, तर प्या दारू!हातावर आणून पानावर खाणाºया अनेक कुटुंबांची संचारबंदीने कोंडी केली आहे. अशातच कष्टकरी पण अल्पशिक्षित लोकांमध्ये भलत्याच अंधश्रद्धा वाढल्या आहेत. पिंपळगाव परिसरातील एका वस्तीत सध्याच अशीच एक अफवा आहे. कोरोनामुळे सारेच मरणार आहे... त्यामुळे येथील अनेक जण २४ तास दारुची हौस भागवित आहेत. यातून लहान मुलेही सुटलेली नाहीत.बाप-लेक संघर्षकाही स्लम वस्त्यांकडे प्रशासनही अनेकदा संशयानेच बघते. मात्र येथे अनेक शिकणारीही मुले आहेत. शिकल्यावरही काहींच्या वाट्याला बेरोजगारी आलीय. अशा बेरोजगारांना इतरवेळी बापाची नजर चुकवून दिवसभर घराबाहेर भटकावे लागते. गरिबीतून उडणाऱ्या बाप-लेकाच्या भांडणाच्या ठिणग्या येथे नव्या नाहीत. पण आता संचारबंदीमुळे गरिबीशी झगडणारा बाप आणि बेरोजगारीने मान तुकविणारा तरुण २४ तास एकाच घरात राहताना अनेकांची घुसमट होत आहे.
सांगा, टीचभर खोलीत कसे काढणार २४ तास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST
यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घेऊन घरी आहे. कुणाचे घर टोलजंग नसले तरी किमान चार लोकांचा निर्वाह होऊ शकेल इतके सुटसुटीत आहे. मात्र स्लम वस्त्यांमध्ये अशी परिस्थिती नाही.
सांगा, टीचभर खोलीत कसे काढणार २४ तास?
ठळक मुद्देमागास वस्त्यांमध्ये संचारबंदीचा फज्जा : अर्धा संसार रस्त्यावर, बेरोजगार तरुणांची घुसमट