लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील कॉन्व्हेंटला शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या विवाहितेने दीड वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मृतक १९ मार्च रोजी रात्री जेवण आटोपल्यावर घरची मंडळी झोपली असताना बेपत्ता झाल्या होत्या. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घराशेजारी असलेल्या विहिरीत मायलेकी मृत अवस्थेत आढळून आल्या. कोमल उमेश उलमाले (वय ३५) व श्रुती वय (दीड वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. येथील विश्रामगृह परिसरात त्यांचे वास्तव्य होते. १९ मार्च चे रात्री ८ वाजताच्या दरम्यान पती उमेश, दोन मुली, सासू-सासरे यांनी एकत्र जेवण केले. थोड्या वेळाने कुटुंबातील सर्व मंडळी आपआपल्या खोलीत झोपी गेल्यानंतर कोमलने दीड वर्षाच्या श्रृती नामक लहान मुलीसह मागच्या दारातून घर सोडले. घरून जाताना कोमलने लहान मुलीला दूध पाजण्यासाठी दुधाची बॉटल सोबत घेतली. ११ वाजताच्या दरम्यान, पत्नी व लहान मुलगी घरी नसल्याचे पतीला लक्षात आले. याची माहिती कुटुंबीयांसह शेजाऱ्यांना व नातेवाइकांना देण्यात आली. सगळ्यांनी रात्री शोध घेतला; परंतु कोमल कुठेही आढळून आली नाही. शनिवारी, २० मार्च रोजी सकाळी साडे सात वाजता कोमलचे पती उमेश उत्तम उलमाले यांनी पत्नी हरविल्याची तक्रार पोलिसात केली. शोधाशोध सुरू असताना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान, घराशेजारील नीलेश थेरे यांच्या शेतातील विहिरीत दुधाची बॉटल व चपला पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली. पाण्यात गळ टाकून शोध घेतला असता कोमल व श्रुती एकमेकींना कवटाळून मृत अवस्थेत आढळून आल्या. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार करीत आहेत.
विहिरीवर तरंगली दुधाची बाटली कोमलने दीड वर्षाच्या श्रृतीसह विहिरीत उडी घेतली. दोघीही मायलेकी बुडाल्यानंतर लहानग्या श्रृतीच्या दुधाची बाटली तरंगत राहिली. ती बाटली पाहूनच लोकांच्या निदर्शनास हा आत्महत्येचा प्रकार आला. या घटनेने खळबळ उडाली.