यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वादग्रस्त सहायक लेखा अधिकारी महादेव गवई यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले. यापूर्वी त्यांची दोन विभागात बदली झाली. मात्र त्यांनी सातत्याने शासन आदेशाची अवहेलना केली. आपल्या विभाग प्रमुखाच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे.गवई यांची २०१३ मध्ये कृषी विभागात आणि त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात बदली झाली होती. मात्र रॉयल्टी गोळा करण्याची पोस्ट हातून जावून नये म्हणून त्यांनी विविध मार्गाने दबाव आणून हा बदली आदेश अंमलात येऊ दिला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दबावाला भीक न घालता गवईवर निलंबनाची कारवाई केली. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. याच पध्दतीने अनेक कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांचे आर्थिक संबंध गुंतलेले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ते आपली खुर्ची सोडण्यास तयार नाही. अशा सर्वच कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन तीन वर्षानंतर बदलीच्या निकषाप्रमाणे त्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वादग्रस्त सहायक लेखाधिकारी निलंबित
By admin | Updated: January 11, 2015 22:56 IST