नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:44 PM2018-04-12T21:44:43+5:302018-04-12T21:44:43+5:30

अन्यायाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कास्तकाराचे कलेवर गेले तीन दिवस न्यायासाठी शवविच्छेदनगृहात ताटकळत होते. गुरूवारी सायंकाळी कुटुंबीयांनी शंकर चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावाकडे नेला. त्याचवेळी माजी खासदार नाना पटोले यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला.

Submit a complaint to Narendra Modi | नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा

नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा

Next
ठळक मुद्देराजूरवाडीचे शेतकरी आत्महत्याप्रकरण : पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अन्यायाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कास्तकाराचे कलेवर गेले तीन दिवस न्यायासाठी शवविच्छेदनगृहात ताटकळत होते. गुरूवारी सायंकाळी कुटुंबीयांनी शंकर चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावाकडे नेला. त्याचवेळी माजी खासदार नाना पटोले यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही आग्रही मागणी त्यांनी एसपींपुढे मांडली.
राजूरवाडी (ता. घाटंजी) येथील शंकर चायरे या शेतकऱ्याने ‘माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील’ अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातील जनमानस ढवळून निघाले आहे. बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीचाही लाभ मिळाला नाही, त्याला सरकारच जबाबदार आहे, अशी भूमिका घेत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने मृताच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयाची मदत देण्याची मागणी केली. दरम्यान मृताच्या मुलीने घाटंजी पोलीस ठाण्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यामुळे मोदींवर गुन्हा दाखल झाल्याविना शवविच्छेदन न करण्याची ताठर भूमिका शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती व कुटुंबीयांनी घेतली.
गुरुवारी माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शेतकरी शंकर चायरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच माझ्या आत्महत्येला जबाबदार आहे, असे लिहून जीवन संपविले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तत्काळ गुन्हा दाखल झालाच पाहिजे. परंतु, प्रशासन राजकीय दबावात काम करीत आहे. पंतप्रधानांसाठी वेगळा न्याय असतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यभरात उठविणार रान
विश्रामगृहावरून पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याशी चर्चा करून त्यांनी पंतप्रधानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एसपींनी यावेळी कार्यदेशीर कार्यवाही केली जात असल्याचे उत्तर दिले. मात्र, यावर समाधान न झाल्याने नाना पटोले यांनी तेथूनच पोलीस महासंचालक यांच्याशी संवाद साधला. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही संवाद साधला. शेतकरी विरोधी सरकार हटविण्यासाठी आता राज्यभर आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलीस गुन्हा दाखल करीत नसतील तर आपण न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. शासनाने अद्याप चायरे कुटुंबीयांची कोणतीही मागणी मान्य केलेली नाही. मात्र एसपींनी स्वत: रेमण्डच्या एमडींशी बोलून चायरे यांच्या मुलीला नोकरी देण्याची विनंती केली, अशी माहितीही पटोले यांनी पत्रकारांना दिली. आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंकर चायरेवर राजूरवाडीत अंत्यसंस्कार
दरम्यान, सायंकाळी शंकर चायरे यांचा मृतदेह कुटुंबीयांनी राजूरवाडी गावात परत नेला. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, शैलेश इंगोले, साहेबराव पवार, सैयद रफिक, संजय डंभारे, शालिक चवरडोल, किसन पवार, वासूदेव राठोड, रणजित जाधव आदी कार्यकर्त्यांसह पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते. मुख्यमंत्री आज यवतमाळात आले तर आम्हाला नोकरी आणि आर्थिक मदत देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी दौरा रद्द करून अपेक्षाभंग केला, अशी व्यथा यावेळी शंकर चायरे यांची मुलगी जयश्री हिने व्यक्त केली.

Web Title: Submit a complaint to Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.