एसटी महामंडळाला गैरव्यवहाराची वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:04 PM2018-02-04T22:04:01+5:302018-02-04T22:05:21+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगारात गैरव्यवहाराला प्रचंड ऊत आला आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एवढेच नाही तर, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून रकमेची उचल होत असल्याचे प्रकार घडत आहे.

 ST corporation waiver of fraud | एसटी महामंडळाला गैरव्यवहाराची वाळवी

एसटी महामंडळाला गैरव्यवहाराची वाळवी

Next
ठळक मुद्देगंभीर प्रकरणे : अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, चौकशीत झाले स्पष्ट

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगारात गैरव्यवहाराला प्रचंड ऊत आला आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एवढेच नाही तर, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून रकमेची उचल होत असल्याचे प्रकार घडत आहे. अधिकाऱ्यांचे यावर कुठलेही नियंत्रण नाही, हे अनेक बाबीवरून स्पष्ट झाले आहे.
‘एसटी’च्या तोट्याला वाहकच जबाबदार असल्याची ओरड महामंडळाकडून नेहमी केली जाते. मात्र इतरही घटक याला कारणीभूत आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. आर्थिक व्यवहारात एसटी कारवाई करण्यात थोडीही कसर सोडत नसल्याचे सांगितले जाते. तरीही गैरप्रकाराची मालिका सुरूच आहे. टायर फिटरच्या कामासाठी बाहेरील कामगारांची आयात या आगारात करण्यात आली होती. या कामासाठी एसटीचे स्वतंत्र तीन कामगार असताना अवाजवी दरात बाहेरील लोकांकडून टायर फिटरचे काम करून घेतले जात होते. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचून कारवाई सुरू झाली.
या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच १२०० रुपयांच्या अग्रिमचे प्रकरण पुढे आले. डी.आर. बनारसे नामक कामगाराने वाहनाच्या (क्र.८४४१) बेलहाउसिंग कामासाठी यवतमाळ आगाराच्या रोकड शाखेतून १२०० रुपयांची उचल केली. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही खर्चाचा हिशेब या कामगाराने सादर केला नाही. रोकड शाखेतून उचल केलेल्या अग्रिम रकमेची प्रतिपूर्ती ४८ तासांच्या आत करण्याचा एसटीचा नियम आहे. एवढेच नाही तर, सहायक कार्यशाळा अधीक्षकांनी आगार व्यवस्थापकांच्या शिक्क्यावर स्वत:ची स्वाक्षरी करून अग्रिम रक्कम दिली. अधीक्षकाचा प्रभार सध्या जे.बी. खान यांच्याकडे आहे. आर्थिक बाबतीत कामगारांकडून झालेली चूक सहन न करणाऱ्या महामंडळाकडून या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे संपूर्ण कामगारांचे लक्ष लागले आहे.
शिवशाहीला प्रवाशांची प्रतीक्षा
महागामोलाची शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या बसला प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागते. यवतमाळ बसस्थानकातून सकाळी ६ वाजतापासून शिवशाहीच्या फेऱ्या सुरू होतात. काही बसेस तर नेमके प्रवासी घेऊन मार्गावर जाते. अधिक भाडे, प्रवासासाठी इतर बसेस ऐवढाच लागणारा वेळ आणि शिवशाही सोबतच लागणाऱ्या कमी प्रवासभाड्याच्या बसेस यामुळे शिवशाहीला प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते.

Web Title:  ST corporation waiver of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.