लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात होणाऱ्या गर्भपाताची आकडेवारी लक्षवेधणारी आहे. गर्भपाताची कारणेही अनेक आहेत. अल्पवयीन मुलींचे गर्भपात मोठ्या प्रमाणात होतात. त्या खालोखाल नवविवाहित दाम्पत्याकडूनही लवकर मूल नको म्हणून गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. यासोबतच मुले, बाळे मोठी झाल्यानंतर चुकून गर्भधारणा झालेल्या दाम्पत्याकडूनही गर्भपात केला जातो. २० आठवड्याच्या आत गर्भपात करण्यात येतो.
जिल्ह्यातील ६४ गर्भपात केंद्रांवर वर्षभरात चार हजार ३४४ महिलांनी गर्भपात केला आहे. चुकून गर्भधारणा झाल्यानंतर असा निर्णय घेतला जातो. बरेच प्रकरणात गर्भाची वाढ व्यवस्थित नसल्याने गर्भापात व्यंग असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. गर्भपात करण्यासाठी पती-पत्नी दोघांची संमती आवश्यक असते. यासोबतच डॉक्टरांकडून पुरेशे कारणही दिल्यानंतर गर्भपाताला परवानगी दिली जाते. अधिकृत केंद्रावरच सुरक्षितता बाळगून गर्भपात प्रक्रिया करण्यात येते.
सुशिक्षित वर्गात सर्वाधिक प्रमाण नोकरीसाठी मुलबाल लगेच नको या धारणेतून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला जातो.
दोन शासकीय गर्भपात केंद्र वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय या दोन ठिकाणी गर्भपात केंद्राला जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मान्यता देण्यात आली आहे. मागील वर्षभरात वैद्यकीय महाविद्यालयात ४३ महिलांचा गर्भपात करण्यात आला आहे. यावर समिती निर्णय घेते.
अल्पवयीन गर्भवतींची अडचण अल्पवयीन मुलींचा शारीरिक संबंध झाला व त्यातून गर्भधारणा झाल्याचे लक्षात आल्यावर हा निर्णय घेतला जातो. बरेचदा गर्भामुळे अल्पवयीन मातेच्या जीवाला धोका निर्माण होतो. शिवाय कायदेशीर प्रक्रिया केली जाते. अशा स्थितीत गर्भपाताचा निर्णय घेतला जातो.
गर्भपाताची कारणे काय ? गर्भवती राहिल्यानंतर आईला दुर्धर आजाराने ग्रासले असेल, आजाराचा परिणाम गर्भावर होत असेल, गर्भाची वाढ होत नसेल यासह इतरही काही गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर डॉक्टर गर्भपात करण्याचा सल्ला देतात. शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी केंद्रावर गर्भपाताची संख्या अधिक आहे. याबाबतचा लेखाजोखा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रण ठेवला जातो.