ग्रामस्थ संतप्त : सीईओंना प्रतिज्ञापत्र सादर करणार वणी : तालुक्यातील चारगाव येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी संमती देणारा ग्रामसभेचा ठराव चौकशी समितीने वैध ठरविला आहे़ यामुळे ग्रामस्थ संतापले असून आता ठरावावर ज्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, ते ग्रामस्थ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र करून देणार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले़चारगाव चौकीवर गट नं़४७/१ अ, प्लॉट नं. ५५ वर भाडेपट्टीने जागा घेऊन देशी दारूचे परवानाप्राप्त दुकान टाकण्याचा प्रस्ताव अमरावती येथील सतीश हरवानी व इतर तिघांनी उत्पादन शुल्क विभागाकडे सादर केला आहे. त्यासाठी चारगाव ग्रामपंचायतीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आले आहे़ मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही ग्रामसभा न घेता महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ठराव दाखविल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली हती. तक्रारीवरून संबंधित ठरावाची वैधता तपासण्यासाठी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती़ चौकशी अधिकाऱ्यांनी गेल्या १० डिसेंबरला प्रत्यक्ष गावात जाऊन तक्रारकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे बयाण घेतले. त्यावरून गेल्या २५ फेब्रुवारीला महिला ग्रामसभा व २६ फेबु्रवारीला सर्वसाधारण सभा घेण्यात आली़ त्यात देशी दारू दुकानाला ‘ना हरकत’ देण्याचा विषय ठेवण्यात आला होता़ ही ग्रामसभा गावात दवंडी देऊन ठिकठिकाणी नोटीस प्रसिध्द करून घेण्यात आल्याचे चौकशीत आढळून आले़ तसेच दोन्ही सभेत सदर देशी दारू दुकानाला ना हरकत देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले़ त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ व ८ नुसार अंमलबजावणी करून ग्रामसभा घेण्यात आल्याने ‘तो’ ठराव वैध असल्याचा अभिप्राय चौकशी अधिकाऱ्यांनी दिला़ आता त्यावेळी विरूद्ध मते मांडणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे़ चौकशीच्या दिवशी १०६ महिला व ६७ पुरूष, अशा १७३ व्यक्तींनी दारू दुकानाच्या विरोधात मत नोंदविले. २३ महिला व ३५ पुरूष, अशा ५८ व्यक्तींनी ठरावाच्या बाजूने मत नोंदविले़ ग्रामसभेच्या ठरावात काही ग्रामस्थांच्या बनावट स्वाक्षरी आढळून आल्याने आता हे ग्रामस्थ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या तयारीला लागले आहे़ त्यामुळे आता चारगाव येथील दारूच्या दुकानाला परवानगी मिळणार की नाही, याकडे तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
चारगावचा ‘तो’ ठराव वैध
By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST