यवतमाळ शहरात अवतरली शिवशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:11+5:30

यवतमाळच्या शिवतीर्थावर बुधवारी पहाटेपासून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे जिल्हा प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पहिले पुष्प अर्पण केले. त्यांनी शिव मॅरेथॉन दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. या स्पर्धेत एक हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

Shivshahi descended into Yavatmal city | यवतमाळ शहरात अवतरली शिवशाही

यवतमाळ शहरात अवतरली शिवशाही

Next
ठळक मुद्देजिल्हाभर शिवजयंतीचा जल्लोष : शोभायात्रा, विविध देखाव्यांनी लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवरायांचा जयघोष, अश्वारुढ घोड्यांवरून मावळ्यांची घोडदौड, शिवरायांची स्तुती करणारे पोवाडे, ढोल-ताशा पथक, पारंपारिक वेशभूषेतील मराठमोळ्या महिला हे दृश्य कुठल्या शिवकालीन मालिकेमधील नसून यवतमाळातील शीवतीर्थावर दिसत होते. निमित्त होते. शिवजयंतीचे.
यवतमाळच्या शिवतीर्थावर बुधवारी पहाटेपासून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे जिल्हा प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पहिले पुष्प अर्पण केले. त्यांनी शिव मॅरेथॉन दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. या स्पर्धेत एक हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ढोल-ताशा पथकाने शिवतीर्थ परिसरात मनमोहक वादन करून शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. या ठिकाणी चित्रकला स्पर्धाही पार पडली. शिवरायांच्या चित्राचे रंग भरण विद्यार्थ्यांनी केले. शालेय विद्यार्थी ते महाविद्यालयीन विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. शिवकालीन घटनांना प्रत्यक्षात साकारण्याचे काम या चित्रकारांनी केले.
‘गड आला पण सिंह गेला’, तारा राणी या विषयावर रांगोळी रेखाटन स्पर्धाही घेण्यात आली. या अनोख्या स्पर्धेत चिमुकल्यांपासून थोर मोठ्यांपर्यंत कलावंतांनी रांगोळी सहभाग नोंदविला. यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. सकाळी बाईक रॅलीही काढण्यात आली. या रॅलीत महिला, युवक-युवती सहभागी झाल्या होत्या.
शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेली ही रॅली शिवतीर्थावर संपली. या रॅलीत विविध वेशभूषेत महिला, युवक आणि युवती सहभागी झाल्या होत्या. भगवे फेटे आणि भगवे ध्वज या रॅलीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. ‘जय शिवाजी-जय भवानी’ अशा गर्जना अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
सायंकाळी शिवजयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरथ रॅलीच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू होता. शिवराज्यातील विविध शिवकालीन घटना जीवंत करण्याचा प्रयत्न या रॅलीमधील सहभागी झॉकींच्या माध्यमातून करण्यात आला.
शिवकालीन शिस्त आणि ऐतिहासिक प्रसंग यामधून जीवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सावित्री फुले यांची पहिली शाळा, अश्वावर आरुढ शिवराय, माता जिजाऊ, संभाजी महाराज अशा थोर विभूतींच्या वेशभूषा केलेली मंडळी रॅलीचे मुख्य आकर्षण होते. मलखांबावरील चित्तथरारक योगासने मुलींच्या जिम्नॅस्टिक कवायती यावेळी अनेकांचे लक्ष वेधून गेल्या. सायंकाळी शोभायात्रेचे शहरातील विविध चौकांमध्ये जंगी स्वागत झाले. यावेळी रॅलीमध्ये सहभागी शिवप्रेमींना फळ, मिठाई, सरबत, आदींचे वाटप करण्यात आले. मुस्लीम समाज बांधवांनी स्थानिक पाचकंदील चौकात विशेष स्टॉल लावला होता. समाज बांधवांच्यावतीने रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींच्या अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. दिवसभर शहरच नव्हे, तर जिल्ह्यात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
 

Web Title: Shivshahi descended into Yavatmal city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.