शिवसेनेची आंदोलने बंद का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:05 PM2018-06-18T22:05:01+5:302018-06-18T22:05:25+5:30

काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धुमधडाक्यात आंदोलने करीत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात होता.

Shivsena's agitation stopped? | शिवसेनेची आंदोलने बंद का ?

शिवसेनेची आंदोलने बंद का ?

Next
ठळक मुद्देसंतप्त शेतकऱ्यांचा सवाल : खासदार गवळींना जिल्हा कचेरीत घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धुमधडाक्यात आंदोलने करीत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात होता. परंतु भाजप सरकारमध्ये गवळी, राठोड यापैकी कुणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करताना रस्त्यावर उतरले नाहीत. शिवसेना अचानक बॅकफूटवर जाण्यामागील कारणे काय, असा सवाल संतप्त शेतकºयांनी सोमवारी खासदार भावना गवळी यांना विचारला.
आढावा बैठकीच्या निमित्ताने भावना गवळी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या असता घाटंजी व महागाव तालुक्यातील शेतकरी तेथे धडकले. त्यांनी गवळी यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. लोकसभा व विधानसभा निवडणूककाळात आम्ही शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहिलो, तुम्हाला निवडून दिले. परंतु तुम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. राज्यमंत्री संजय राठोड हेसुद्धा मूग गिळून आहेत. शिवसेना बघ्याची भूमिका घेत असल्याने सरकार वाटेल तसे वागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कुणी वालीच उरलेले नाही, अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये डाळवर्गीय पिके घेण्याचे आवाहन शेतकºयांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तूर लावली. मात्र, शासनाने ती खरेदी न करता अन्य देशातून तुरीची आयात केली. आजही शेतकºयांची तूर पडून आहे. विकल्या गेलेल्या तुरीला भाव नाही. शेतकऱ्यांना संगणक आणि सरकारचे धोरण समजले असते तर तूर केव्हाच विकली गेली असती, असा उपरोधिक टोलाही या शेतकऱ्यांनी गवळी यांना लगावला.
पेरणी झाल्यावर कर्ज देणार काय?
दीड लाखावरील कर्ज प्रकरणात बँकांनी शेतकऱ्यांकडून वरचे कर्ज भरून घेतले. मात्र, नवीन कर्ज अजूनही दिले नाही. कर्जाची रक्कम बँक खात्यात वळती व्हायची आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. खासदारांनी इतके टोकाचे पाऊल उचलू नका, म्हणत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्या बँक अधिकाऱ्यांशी बोलल्या. नंतर आठ दिवसात प्रश्न सुटेल, असे सांगताच शेतकरी अधिक संतापले. पेरणीनंतर मदत मिळणार का, असा प्रश्न त्यांनी केला. केंद्र आणि राज्याचे सरकार म्हणजे ‘कोल्हा आला रे आला’ असेच काम झाले, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
भावना गवळी म्हणतात, उद्धव ठाकरेंमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, असा दावा खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला आहे. सरकार तूर दरातील तफावतीपोटी एक हजार रुपये देत असले तरी शिवसेनेने ही दोन हजारांची मागणी केली आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आंदोलने करीत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सरकारमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा’ असे आदेशच शिवसैनिकांना दिले असून त्यानुसार वेळोवेळी पक्षाकडून आंदोलने केली जात असून आपण त्यात सहभाग घेत असल्याचा दावा भावना गवळी यांनी शेतकऱ्यांशी बोलताना केला.

Web Title: Shivsena's agitation stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.