कच्च्या इमारती धोकादायक : आदिवासी अपर आयुक्त पद रिक्तरूपेश उत्तरवार यवतमाळ आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी निवासी आश्रमशाळा उभारण्यात आल्या. वसतीलगत जंगलात उभारण्यात आलेल्या या आश्रमशाळा कच्च्या इमारतीत आजही उभ्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वर्ग वाढले असले तरी जागा मात्र तितकीच आहे. त्याच ठिकाणी निवास आणि त्याच खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण असे विदारक दृश्य पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अपर आयुक्तांचे पदच सहा महिन्यांपासून रिक्त आहे. यामुळे आश्रमशाळांचे प्रश्न अधांतरी आहे. जिल्ह्यात २५ शासकीय आणि २५ खासगी आश्रमशाळा आहेत. या ठिकाणी १३ हजार विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. ५०० शिक्षक आहेत. या आश्रमशाळेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पांढरकवडा आणि पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी निवासी राहणे सक्तीचे आहे. मात्र, या ठिकाणी क्वार्टरच नाही. तर अनेक ठिकाणी इमारती पडण्याच्या अवस्थेत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी राहायचे कुठे, असा प्रश्न आहे. यासंदर्भात पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाने निवासी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवास भत्ता कापला आहे. मात्र निवासाची व्यवस्था नसल्याने राहायचे कुठे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. आश्रमशाळा गावाबाहेर जंगलात आहे. त्यातही त्या जीर्ण अवस्थेत आहे. त्यांना शहरालगत अथवा गावाजवळ नेल्यास गावाचे आश्रमशाळेवर लक्ष राहील. यातून मुलांना उत्तम सुविधा आणि चांगले शिक्षण मिळेल. त्याकडे मात्र आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. अमरावतीचे आयुक्त कार्यालय जिल्ह्यातील आश्रमशाळेवर नियंत्रण ठेवते. या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी अशोक आत्राम अपर आयुक्त म्हणून काम पाहत होते. हे पद रिक्त झाल्याने नागपूरच्या आयुक्ताकडे अतिरिक्त भार देण्यात आला. प्रभारी आयुक्तांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आश्रमशाळेत भौतिक सुविधा नाही. आदिवासी विकास विभाग खर्च करतो. मात्र शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र विंग नाही. भोजनाखेरीज शिक्षणाची गुणवत्ता तपासली जात नाही. यामुळे आश्रमशाळा स्पर्धेत मागे पडल्या आहे. क्रीडा आणि कला शिक्षकांची पदे भरली गेलेली नाहीत. प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि क्रीडा साहित्याची कमतरता सतत जाणवते.
आश्रमशाळांचा निवारा वाऱ्यावर
By admin | Updated: March 4, 2016 02:33 IST