यवतमाळ पालिका : सर्वसाधारण सभेत स्वामिनीच्या मागणीला पाठिंबा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दारू दुकाने वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या रस्ते हस्तांतरणाला विरोध करावा, असे आवाहन स्वामिनी संघटनेने केले. त्याला प्रतिसाद देत काँग्रेसचे सर्व नगरसेवक सर्वसाधारण सभेत रस्ते हस्तांतरणाच्या विरोधात मतदान करतील, अशी ग्वाही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘स्वामिनी’ला दिली. यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ३१ मे रोजी होत आहे. या सभेत शहरातील महामार्ग हस्तांतरणाच्या विरोधात ठराव घ्यावा, अशी मागणी स्वामिनी दारूमुक्ती अभियानाने केली. त्यावरून सभेच्या विषयसूचित २५ व्या क्रमांकावर हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. आता सर्व नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करून रस्ते हस्तांतरण नाकारावे, असे निवेदन स्वामिनीने सर्व नगरसेवकांना तसेच नगराध्यक्षांना दिले. तसेच रविवारी स्वामिनीतर्फे विधान परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक रस्ते हस्तांतरणाला सर्वसाधारण सभेत विरोध करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. हा निर्णय जनतेच्या हिताचा असेल. यवतमाळ शहरातील चार महामार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याने शहरातील सर्व दारू दुकाने वाचविण्यात आली. परंतु, हा प्रकार जनतेच्या हिताचा नाही. माझा व्यक्तीश: व्यसनाला विरोध आहे, असे ते म्हणाले. चंद्रपूरच्या दारूबंदीचे आम्ही समर्थन करतो. परंतु, एकाच जिल्ह्यात बंदी का करता, असा मुद्दा सभागृहात उचलला असता सरकारने महसूल बुडतो असा प्रतिवाद केला. पण अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यात दारूबंदी केल्यावर महसूल बुडत नाही का, असा सवालही माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला. स्वामिनी अभियान गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देत आहे. आम्ही त्यांच्या लढ्यात सहभागी आहोत. ३१ मेच्या यवतमाळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सर्व नगरसेवक ठरावाच्या बाजूने असतील, तसेच संपूर्ण जिल्हा दारूबंदी करण्यासाठीही आम्ही स्वामिनीला सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामिनी अभियानाचे मुख्य संयोजक महेश पवार, मनीषा काटे, अनंतराव कटकोजवार, शेखर सरकटे, मंगला कटकोजवार यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
रस्ते हस्तांतरणाला काँग्रेस नगरसेवक करणार विरोध
By admin | Updated: May 29, 2017 00:49 IST