वायपीएल व बॅडमिंटन स्पर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजनयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती यवतमाळ प्रिमिअर लिग-२०१४ आणि राज्यस्तरीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार, २३ नोव्हेंबर रोजी देश-विदेशात क्रिकेटचे मैदान गाजविणारे तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यवतमाळ प्रिमिअर लिग-२०१४ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा येथील पोस्टल मैदानावर ९ नोव्हेंबरपासून सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिकेटला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. १७ वर्षाआतील १२ शाळांतील निवडक संघ या स्पर्धेत सहभागी झाले. आपल्या चमकदार खेळीने या स्पर्धकांनी यवतमाळकरांची मने जिंकली. या स्पर्धेचा अंतिम सामना दुपारी १२.३० वाजता सुरू होणार आहे. यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) विरुद्ध जायन्टस् स्कूल असा ‘महामुकाबला’ होणार आहे. या अंतिम लढतीची प्रचंड उत्सुकता असून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता होणार आहे. बक्षीस वितरण अर्जून आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू कर्नल या नावाने प्रसिद्ध दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मदन येरावार, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा यवतमाळ पब्लिक स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी कर्नल दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते दुपारी १ वाजता राज्यस्तरीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. लोहारा एमआयडीसी स्थित स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा राहणार आहेत. दिलीप वेंगसरकर यवतमाळात येत असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत आहे.
पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
By admin | Updated: November 22, 2014 23:08 IST