जिल्हाधिकारी : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचा प्रयत्नयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल, भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करता यावा यासाठी ओटा आरक्षित ठेवण्यात आला आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेला भाजीपाला, धान्य बाजारात विक्रिसाठी आल्यानंतर अडते भाव पाडून खरेदी करतात. तसेच त्यांच्याकडून विक्री केलेल्या मालाची अडतही (रक्कम) घेतात. तर हाच शेतमाल व्यापारी विकत घेउन ग्राहकांना चढया दराने विक्री करतात. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे थेट शेतकऱ्यांचा शेतमाल हा ग्राहकांना विक्री करता यावा यातून त्यांची आर्थिक समृद्धी व्हावी, यासाठी यवतमाळ बाजार समितीमधील ओटा आरक्षित ठेवण्यात आला आहे. सध्या यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. संचालक मंडळांचा कोणताही वचक व्यापारी व दलालांवर नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्व सोयीसुविधा व्यापारी व अडत्यांना मिळतात. शेतकऱ्यांना मात्र आपला माल उघड्यावर ठेवावा लागतो. मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असताना बाजार समिती व्यवस्थापन मात्र मूग गिळून असते. शेतकरी या ठिकाणी ग्राहकांना आपला माल थेट विकू शकत नाही. याबाबत बळीराजा चेतना अभियान समितीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता शेतकरी बाजार समितीत आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतील. शेतकऱ्यांना आपला विक्रीस ठेवण्यासाठी ओटा आरक्षित ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला माल थेट ग्राहकांना विक्री करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांना केले आहे. (प्रतिनिधी)
शेतमाल विक्रीसाठी आता जागा आरक्षित
By admin | Updated: March 4, 2016 02:34 IST