ग्राहक संघटना : वीज ग्राहकांची फसवणूक होवू नयेयवतमाळ : विजेचे बिल हे वीज मीटरवर अवलंबून आहे. परंतु अनेकदा वारंवार तक्रार करूनही मीटरची तपासणी होत नाही. तपासणी झाल्यास महावितरणच्याच यंत्रणेकडून ती होत असल्याने ग्राहकांना योग्य न्याय मिळेल, याची खात्री नसते. त्यामुळे वीज मीटर तपासण्यासाठी वितरण कंपनीव्यतिरिक्त फॉरेन्सीक लॅबमध्ये एका वेगळ्या यंत्रणेची नियुक्ती करावी, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.जिल्ह्यात घरोघरी व दुकानांमध्ये लावण्यात आलेले वीज मीटर अतिशय वेगाने फिरत असल्याच्या वीज ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु वितरण कंपनी मात्र या तक्रारींवर तपासणीअंती समाधानकारक कारवाईच करीत नसल्याचे निदर्शनास येते. जर मीटर योग्य स्थितीत आहे तर तेच मीटर पुन्हा लावून देण्यात यावे. परंतु तपासणीसाठी म्हणून काढून नेलेले मीटर पुन्हा कधीच वीज ग्राहकांना पाहायलाच मिळत नाही. ते मीटर पाहण्याची ग्राहकाने मागणी केल्यास मीटर स्क्रॅप केल्याचे सांगितले जाते. ज्याप्रमाणे ग्राहकाने बाजारातून वस्तू विकत घेतल्यास त्याचे वजन बरोबर आहे का, तसेच आपल्याला दिलेली वस्तू विकत घेतल्यास त्याचे वजन बरोबर आहे का, आपल्याला दिलेली वस्तू योग्य दर्जाची आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी वजनमाप अधिकारी व अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाकडे तक्रार करता येते. त्याप्रमाणे ग्राहकांना संबंधित कार्यालय न्याय मिळवून देते. याच धर्तीवर वीज वितरण कंपनीने लावलेल्या वीज मीटरमध्ये बिघाड असल्यास ते त्रयस्त यंत्रणेकडून तपासून ग्राहकांना योग्य माहिती देण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. सध्या विद्युत मीटर तपासणारे अधिकारी हे वीज वितरण कंपनीचेच असतात. त्यामुळे ते कंपनीचाच फायदा पाहतील आणि कंपनीसुद्धा मीटर मंद अथवा योग्य फिरत असल्याचे दाखविते. कारण ते मीटर वेगाने फिरत असल्याचे कंपनीने दाखविल्यास ग्राहकाचे विद्युत बिल कमी करून द्यावे लागेल व आपण दोषी असल्याचे निदर्शनास येईल म्हणून वितरण कंपनी मीटर मंद अथवा योग्य असल्याचाच अवाल देते. अशावेळी वीज कंपनीकडून ग्राहकांना तुमच्या वापरापेक्षा मीटर मंद फिरत असल्यामुळे तुम्हालाच दंड भरावा लागेल, अशी भीती दाखविली जाते. म्हणून ग्राहकांना योग्य न्याय मिळण्यासाठी वीज मीटरच्या तपासणीसाठी वितरण कंपनीशिवाय फॉरेन्सीक लॅबमध्ये एक वेगळी यंत्रणा असावी. जी वीज मीटरची तपासणी करून देईल आणि वीज ग्राहकांना योग्य न्याय देवू शकेल. तसेच तपासणीसाठी आलेले मीटर हे योग्य आहे की मंद आहे तसेच ते वेगाने फिरणारे आहे काय हे योग्यरित्या सांगू शकेल. अशा प्रकारे वितरण कंपनी सोबतच ग्राहक त्रयस्त यंत्रणेवर विश्वास ठेवू शकेल. परंतु या यंत्रणेमध्ये ग्राहकाच्या हितासाठी संपूर्ण पारदर्शकता गरजेची आहे. त्यामुळे या प्रकारची त्रयस्त यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वीज मीटर तपासणीसाठी त्रयस्त यंत्रणा आवश्यक
By admin | Updated: November 2, 2016 01:04 IST