यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर (शिखर) प्रतिनिधी म्हणून आपले नाव एकमताने पाठविले जावे यासाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही संचालकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिखर बँकेवर अमरावती महसूल विभागातून दोन संचालक जाणार आहेत. मात्र तत्पूर्वी जिल्हा सहकारी बँकांना आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. १५ मेपूर्वी या प्रतिनिधीचे नाव कळवायचे आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शिखर बँकेवर जाण्यासाठी अनेकांनी तयारी चालविली आहे. यापूर्वी ११ महिने संचालक राहिलेल्या डॉ. रवींद्र देशमुख यांचे नाव प्रतिनिधी म्हणून आघाडीवर आहे. मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख तसेच भाजपाच्या गोटातील एक निकटवर्तीय संचालकसुद्धा शिखर बँकेसाठी इन्टरेस्टेड असल्याचे सांगण्यात येते. बँकेतून एकमत होवो अथवा नाही आपण प्रतिनिधी म्हणून जाणारच असा निर्धार डॉ. रवींद्र देशमुख यांनी बोलून दाखविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्हा बँकेत कुणा एकाच्या नावावर एकमत होणार की ठराव मतदान घ्यावे लागणार याकडे लक्ष लागले आहे. १० ते १२ एप्रिल दरम्यान जिल्हा बँकेची बैठक बँक प्रतिनिधीच्या नावावर निर्णय घेण्यासाठी बोलाविली जाणार आहे. डॉ. देशमुख यांच्या नावाला हिरवी झेंडी मिळते की विरोध होतो याकडे सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)औटघटकेची संधीराज्य बँकेवर जिल्ह्यातून गेली दहा वर्ष किरण देशमुख संचालक म्हणून राहिले आहेत. अलिकडच्या निवडणुकीत डॉ.रवींद्र देशमुख शिखर बँकेवर गेले. मात्र अवघ्या अकराच महिन्यात तेथील संचालक मंडळ बाजूला करून प्रशासक मंडळ नेमले गेले. त्यामुळे डॉ.देशमुखांसाठी शिखर बँक औटघटकेची ठरली. आता त्यांनी पुन्हा फिल्डींग लावली आहे.
शिखर बँकेसाठी जिल्हा बँकेत चढाओढ
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST