लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरासह तालुक्यात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने ग्रामीण भागात कहर केला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नाल्याच्या काठावरील चार ते पाच गावांतील शेकडो एकर शेतजमीन खरडून गेली. त्यामुळे पेरलेले बियाणेही वाया गेले. आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. चोंढी येथील नाल्याला पूर आल्याने छोट्या पुलावरून घराकडे जात असलेला एक अल्पभूधारक शेतकरी पुरात वाहून गेला. तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी सोमवारी वरूड मंडळातील गावांची पाहणी करून शेतीचे पंचनामे केले व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.तालुक्यात वरूड महसूल मंडळातील ४० मिमी पावसामुळे या परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. हा नाला गहुली येथून चोंढी, बान्सी, पिंपळखुटा, एरंडा आदी गावांपासून वाहतो. नाल्याच्या काठावरील या सर्व गावांतील जवळपास शंभर एकरावरील सोयाबीन, कापूस, कारले आदी पिके खरडून गेली. एरंडा येथील कसान भिका राठोड या शेतकऱ्याने दोन एकरात कारल्याची लागवड केली होती. मात्र या वादळी पावसाने संपूर्ण शेती खरडून गेली. तसेच शेतातील ड्रीपसुद्धा वाहून गेल्याने त्यांचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.तसेच चोंढी, बान्सी, पिंपळखुटा व एरंडा येथील प्रतीक ढाकरे, पवन ढाकरे, बाबूसिंग आडे, लवकुमार ढाकरे, जयंता राठोड, दत्ता पाईकराव, रंजना पाईकराव, गणेश ढाकरे आदी शेतकºयांचे नाल्याच्या काठावरील पिके खरडून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे.तर चोंढी येथील नाल्याला आलेल्या पुरात नाल्यावरील छोट्या पुलावरून घराकडे जात असलेल्या बापूराव बारकाजी ढगे (५५) हा अल्पभूधारक शेतकरी वाहून गेला. रात्रीच्या अंधारात तो जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटर वाहत जाऊन बंधाऱ्याला अडकला. सोमवारी (२९) सकाळी त्याचा मृतदेह गावकऱ्यांनी बाहेर काढला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुली असून या घटनेने चोंढी गावावर शोककळा पसरली. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या सर्व पूरग्रस्त भागाचा तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, तलाठी भाऊ बोडखे, कृषी सहायक भाऊ भिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रणवीर पाटील, कुलदीप गावंडे आदींनी पाहणी केली.तालुक्यातील सहा मंडळांना फटकापुसद शहर व तालुक्यात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस कोसळला. तासभर तालुक्यात नऊपैकी पाच मंडळात जवळपास ५९.७२ मिमी पाऊस कोसळला. यामध्ये सर्वाधिक वरूड मंडळात ४० मिमी, पुसद मंडळ १४ मिमी, ब्राह्मणगाव ५.२२ मिमी, बोरी खुर्द मंडळात सात मिमी, जांबबाजार मंडळात ३.५० मिमी असा एकूण ५९.७२ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पुसद तालुक्यात १६२.८३ मिमी एवढ्या पावसाची नोंद तहसील कार्यालयाने केली आहे.पुसद तालुक्याच्या वरूड महसूल मंडळात जोरदार वादळी पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पूर आला. नाल्याच्या काठावरील शेती या पुरामुळे खरडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांची जवळपास शंभर एकरावरील पिके वाहून गेली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट कोसळले असून शासनाने त्वरित मदत द्यावी.- रणवीर पाटील, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पुसद तालुक्यात पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST
तालुक्यात वरूड महसूल मंडळातील ४० मिमी पावसामुळे या परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. हा नाला गहुली येथून चोंढी, बान्सी, पिंपळखुटा, एरंडा आदी गावांपासून वाहतो. नाल्याच्या काठावरील या सर्व गावांतील जवळपास शंभर एकरावरील सोयाबीन, कापूस, कारले आदी पिके खरडून गेली.
पुसद तालुक्यात पावसाचा कहर
ठळक मुद्देशेकडो एकर बियाणे खरडून गेले : कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे केले