लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १८ दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. उन्हाच्या वाढत्या चटक्याने पिके करपण्यास सुरुवात झाली होती. पावसात खंड पडल्याने रस शोषण करणाऱ्या किडींचे पिकांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले होते. यामुळे उत्पन्नाला मोठा फटका बसणार होता. अशा परिस्थितीत वरुण राजाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. खरिपातील कपाशीच्या पिकावर पांढऱ्या माशीने हल्ला चढविला होता. याशिवाय रस शोषण करणाऱ्या किडी आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पात्या आणि फुलांवर आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याशिवाय सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाही धरल्या आहेत. पाण्याअभावी या शेंगा गळण्याची शक्यता होती. आता पाऊस आल्याने पीक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा आला होता. तर मूग आणि उडीद या दोन्ही पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती. शेवटच्या क्षणाला पाऊस बरसल्याने हातातोंडाशी येणारे पीक वाचले आहे. सलग ३६ तासापासून कोसळणाऱ्या पावसाने शहरातील रस्तेही स्वच्छ केले आहे.
जिल्ह्यात पिकांना संजीवनी देणारा पाऊस झाला आहे. अनेक दिवसांपासून पावसामध्ये खंड होता. यामुळे पीक परिस्थिती चिंताजनक झाली होती. आता पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. - नवनाथ कोळपकरजिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.