खरेदीसाठी झुंबड : जमावबंदी आदेश हटविला पुसद : दोन दिवसाच्या तणावानंतर गुरूवारी पुसद शहर पूर्वपदावर आले. बाजारपेठे उघडली असून खरेदीसाठी नागरिकांनी झुंबड केली होती. तसेच बुधवारी लागू करण्यात आलेला जमावबंदी आदेशही मागे घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा स्वास सोडला.रमजान ईदच्या पवित्र दिवशी येथील शिवाजी चौकात वाहन पार्किंगच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद झाला. त्यामुळे शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली. शहरात काही भागत जाळपोळ होऊन दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांची परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ११ जणांना अटक केली होती. गुरूवारी सकाळी पुसद शहर पोलीस ठाण्यात एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याशी चेंंबर आॅफ कॉमर्स व डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी दवाखाने व व्यापारी प्रतिष्ठानांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तर स्थानिक भक्ती हॉटेलमध्ये ना. मनोहरराव नाईक व पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन शुक्रवारी नागपंचमी असल्याने आजपासून बाजारपेठ उघडावी या विषयावर चर्चा झाली. ना. मनोहरराव नाईक व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पदाधिकाऱ्यांनी विश्वास दिल्याने दुपारी १२ वाजता व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. दोन दिवसांपासून जमावबंदी आदेशामुळे घरात बसून असलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, खरेदीसाठी बाजारात झुंबड दिसून आली. बैठकीला चेंबर आॅफ कॉमर्सचे बिपीन चिद्दरवार, दीपक आसेगावकर, सूरज डुबेवार, संगमनाथ सोमावार, गिरीष अग्रवाल, अॅड़ भारत जाधव, संजय बजाज, अनंजय सोनी, किरण वानरे, अनिल ग्यानचंदाणी, ललित सेता, कैलास जगताप, भाऊ पंडीतकर, ज्ञानेश्वर शिंदे तसेच डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. सुधीर झिलपेलवार, डॉ. मधुकर नाईक, डॉ. विजय राठोड, डॉ. शैलेश नवथळे, डॉ. आरीफ अहमेद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुसद बाजारपेठ अखेर पूर्ववत
By admin | Updated: August 1, 2014 00:29 IST