घाटंजी तालुक्यातील नागरिकांना त्रास : अधिकाऱ्यांचाही वचक संपला, कर्मचाऱ्यांची मनमानीघाटंजी : कुठल्याही प्रकारच्या कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची येथील पंचायत समितीत अडवणूक होते. एकूणच या कार्यालयाचा कारभार बेताल झाला आहे. कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. अधिकाऱ्यांचाही त्यांच्यावरील वचक संपल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होत आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. सुटीच्या अर्जाशिवाय गैरहजर राहणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित न होणे, नेमून दिलेल्या टेबलवरील जबाबदारी पार पाडण्यात कुचराई करणे, असा प्रकार या पंचायत समितीत सुरू आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घ्यावा लागतो. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यासोबतच बहुतांश कर्मचारी पानटपरी किंवा चहा टपरीवर आढळून येतात. याच ठिकाणी त्यांचा शोध घ्यावा लागतो.पंचायत समितीमार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. मात्र सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या धोरणामुळे अनेक नागरिकांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते. कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्याविषयी त्रस्त नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही काही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. कामधंदा सोडून ग्रामीण भागातील नागरिक या कार्यालयात पोहोचतात तेव्हा त्यांना कर्मचारीच उपलब्ध होत नाही. केव्हा येणार याविषयी कुणीही माहिती देत नाही. गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार नागरिकांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. (प्रतिनिधी)
पंचायत समितीचा बेताल कारभार
By admin | Updated: October 19, 2015 00:21 IST