लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्याच्या भाजपा राजवटीमुळे भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्याला मोठा धोका आहे. नोटाबंदीचा निर्णय हे त्याचे उदाहरण. काळा पैसा तर काही परत आला नाही. सर्वसामान्यांना मात्र प्रचंड त्रास झाला, अजूनही होत आहे. जीएसटीसारख्या चांगल्या आणि गरजेच्या कायद्याचे या सरकारने वाटोळे केले आहे. केवळ योजनांचे नाव बदलून श्रेय लाटणारा भाजपा हा पक्ष गेम चेंजर नसून केवळ नेम चेंजर आहे, अशी टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने डॉ. भालचंद्र मुणगेकर व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुणगेकर पुढे म्हणाले, इंदिरा गांधींनी ज्या विपरित परिस्थितीत राजकारण सांभाळले, तोच आदर्श ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी २०१९ च्या दृष्टीने कामाला लागण्याची गरज आहे. भाजपा हे या देशाची धर्मनिरपेक्षता, समानता या संकल्पनांसाठी संकट आहे. हे संकट २०१९ मध्ये आपोआप टळणार नाही. देश एकत्र ठेवायचा असेल तर काँग्रेसने आंदोलनात उडी घेतली पाहिजे. मुस्लिम राष्ट्र ही संकल्पना जीनांच्याही आधी सावरकरांनी मांडली. हिंदूधर्म वेगळा आणि हिंदूत्व वेगळे. हिंदू राष्ट्राला विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध नव्हे. हिंदूत्व हे असे राजकीय तत्वज्ञान आहे, जे लोकशाही, सर्वसमावेशक विकास आणि समानतेचा विरोध करते. हिंदूराष्ट्र म्हणजे मूठभर लोकांचे सरकार. त्यात १० कोटी आदिवासी, २० कोटी दलित आणि ५० कोटी ओबीसींना कोणतेही स्थान नाही. हा धोका लक्षात घेतला तर सध्या भाजपामध्ये असलेल्या ओबीसींचे मेंदू सुधारण्याची गरज आहे, असा घणाघातही डॉ. मुणगेकर यांनी केला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व समजावून सांगताना कुमार केतकर म्हणाले, जागतिक मंदीत भले भले देश नेस्तनाबूत झालेले असतानाही डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. या यशाच्या मूळाशी इंदिरा गांधीचे कर्तृत्व आहे. त्यांनी फार पूर्वी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. त्यामुळे मंदीतही देश तरला. धर्मवादी संस्थांचा धोका ओळखूनच इंदिरा गांधींनी राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन संकल्पना समाविष्ट केल्या. त्यासाठी कोणीही चळवळी नव्हत्या केल्या. पण देशाचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतो आहे. जयप्रकाश नारायण यांनी लष्करी हुकूमशाहीकरिता चिथावनी दिल्यामुळेच इंदिरा गांधींना आणीबाणी लागू करावी लागली. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वत:च निवडणुका लावल्या. त्यांच्यावर ४८ आयोग लावूनही त्यांच्याविरुद्ध एकही पुरावा मिळू शकला नाही. आज अनेकांच्या डोक्यात हिंदू राष्ट्राची वावटळ शिरली आहे. पण हिंदूराष्ट्र केल्यास देशाची फाळणी अटळ आहे.या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंतराव पुरके, शिवाजीराव मोघे, माजी आमदार विजय खडसे, विजयाताई धोटे, काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, जीवन पाटील आदी उपस्थित होते.
भाजपा राजवटीमुळे राजकीय, सामाजिक स्थैर्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:28 IST
सध्याच्या भाजपा राजवटीमुळे भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्याला मोठा धोका आहे. नोटाबंदीचा निर्णय हे त्याचे उदाहरण. काळा पैसा तर काही परत आला नाही.
भाजपा राजवटीमुळे राजकीय, सामाजिक स्थैर्याला धोका
ठळक मुद्देभालचंद्र मुणगेकर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोह