मोक्कातील फरार आरोपीचा शोध : अटकेसाठी भाजपातून वाढतोय दबाव यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या आणि मोक्कातील फरार आरोपी प्रवीण दिवटे याच्या शोधार्थ पोलीस पथक दोन दिवस पुण्यात मुक्कामी होते. मात्र तेथे यवतमाळ पोलिसांना गुंगारा देऊन दिवटे फरार होण्यात यशस्वी झाला. दिवटे आणि साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे नोंदविले गेले. त्याच्या साथीदारांची धरपकड केली गेली. मात्र तो गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना सातत्याने हुलकावणी देत आहे. तो नागपुरात एका कुख्यात गुंडाच्या आश्रयाला असल्याची पोलिसांची माहिती आहे. मात्र या गुंडाच्या घरात जाऊन झडती घेण्यास पोलीस धजावत नसल्याचे सांगितले जाते. ही पोलिसांमध्ये असलेली गुन्हेगारांची दहशत की मिलीभगत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १५ डिसेंबर रोजी दिवटे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात हजर राहणार असल्याची टीप यवतमाळ पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वात पोलीस पथक दोन दिवस पुण्यात तळ ठोकून होते. साध्या वेशात त्यांनी कार्यक्रम स्थळी पहारा दिला. मात्र यवतमाळ पोलीस आल्याची कुणकुण लागल्याने तो तेथून पसार झाल्याचे पोलिसातून सांगितले जाते. पोलिसांना रिकाम्या हाताने पुण्यातून परतावे लागले. तत्पूर्वी गत आठवड्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक पथक नागपुरात गेले होते. मात्र त्यांची ही नागपूर भेट केवळ औपचारिकता ठरली. दिवटेवरील मोक्काच्या कारवाईत राजकारण शिरले आहे. भाजपातील समकक्ष पदाधिकाऱ्यांनी थेट अमरावतीपर्यंत संधान बांधून दिवटे आणि कंपनीवर मोक्का लावण्यात यश मिळविले. त्यानंतर त्यांनी या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढविला. साथीदार अटक झाले असले तरी दिवटे अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने भाजपातील संबंधित पदाधिकारी अस्वस्थ आहेत. पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत दिवटेला अटक करावी म्हणून लोकप्रतिनिधी मार्फत पोलिसांवर आणखी दबाव निर्माण केला जात आहे. त्यासाठी यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर असे प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप पोलीस व पर्यायाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना अद्याप तरी यश आलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलिसांना पुण्यात हुलकावणी
By admin | Updated: December 18, 2014 23:01 IST