यवतमाळ : शहरातील पोबारू ले-आऊट येथे एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई अन्यायकारक व खोटी असल्याची याचिका न्यायालयात दाखल झाली. या प्रकरणात न्यायालयाने कारवाई करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहे.
नासीर खान मजीद खान यांच्या घरी ४ एप्रिल २०२२ रोजी रात्री सायबर सेल पथकाने धाड टाकली. जुगार कारवाई करीत घरातील साहित्याची मोडतोड केली. कपाटातील रोख रक्कम व दागिने काढून नेले, असा आरोप नासीर खान यांनी केला. या बाबत त्यांनी पोलिस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणात याचिकाकर्त्याची बाजू ॲड. ए.जे. तगाले यांनी मांडली. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी युक्तीवाद ग्राह्य धरत या प्रकरणात कारवाई करणारे पोलिस जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत, सुमीत पाळेकर, पंकज गिरी, प्रवीण कुथे, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे यांच्या विरोधात कलम १६६, ४५२, ४२७, ४४१, ३४१, ३५०, ३७९, ३८०, ५०० सह कलम ३४ भादंवि अंतर्गत आरोप ठेवण्यात आले. या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना २३ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला, अशी माहिती ॲड. एम.जे. तगाले यांनी सांगितली.