यवतमाळ : गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच घेताना एका जमादाराला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या वायरलेस कक्षात केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. रमेश काशीनाथ उघडे असे लाच स्विकारताना अटक करण्यात आलेल्या जमादाराचे नाव आहे. तो यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. शहरातीलच बांगरनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील विवाहितेने पती, सासरे, सासू आणि नणंदयाविरूध्द शहर पोलिसात तक्रारअर्ज दिला होता. त्यावर कारवाई न झाल्याने सदर विवाहितेने यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधीकारी राहूल मदने यांची भेट घेवून तक्रार दिली होती. त्यावर एसडीपीओ मदने यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तो अर्ज पुढील कारवाईसाठी जमादार उघडे यांच्याकडे आला होता. त्यांनी तक्रारीत नमूद गैरअर्जदारांना बोलाविले. तसेच त्यांना गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठी चार हजार रूपयांची मागणी केली. त्यांनीही मागणीला होकार देवून येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्याकडे तक्रार दिली. त्यावरून शासकीय पंचाकरवी लाच मागणीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर १ आॅगस्टला दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. यावेळी जमादार उघडे यांनी लाचेची रक्कम स्विकारताच ठाण्याच्या आवारात दडून असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेवून अटक केली. (स्थानिक प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यातच जमादाराला लाच घेताना पकडले
By admin | Updated: August 3, 2014 00:18 IST