लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सावत्र मामाकडून झालेल्या सततच्या अत्याचाराने भाची गर्भवती झाली. त्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. या त्रासाला कंटाळून पीडित अल्पवयीन भाचीने विषप्राशन केले. गुरूवारी याप्रकरणी तक्रार दाखल होताच, शिरपूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.पीडित अल्पवयीन मुलगी ही शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आजीसोबत वास्तव्याला आहे. आरोपी सावत्र मामा हा मुळचा राजूर (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. मात्र तो गेल्या एक वर्षापासून पीडित मुलीच्या गावाला पत्नीसह राहायला गेला. एक दिवस घरी कुणी नसताना आरोपी मामाने पीडित मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जिवाच्या भितीपोटी पीडिता पुढे अनेक दिवस मामाचा अत्याचार सहन करत राहिली. याचदरम्यान, पीडितेला गर्भधारणा झाली. मामाने तिच्यावर दबाव टाकून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. मामाच्या सततच्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या युवतीने २० ऑगस्ट रोजी विषप्राशन केले. तिला तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारानंतर तिने तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मामाविरूद्ध भादंवि ३७६, (२) (एन) ५०६, सहकलम ४, ६, ८ पोक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी दिली. ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राम कांडुरे तपास करीत आहे.
पोलिसांचा पुढाकार - २५ ऑगस्टला ती नातलगासह शिरपूर पोलीस ठाण्यात आली. मात्र भीतीपोटी तक्रार दाखल न करता ती परत आपल्या गावी निघून गेली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी २६ ऑगस्टला पीडितेचे गाव गाठत तिच्याकडून तक्रार लिहून घेतली.