मारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयाच्या गोदामगध्ये हजारो रूपयांच्या कालबाह्य औषधी अस्ताव्यस्त पडून असल्याचे उघड झाले. ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांनी कसे ग्रासले, याचा पाढाच येथे नव्याने रूजू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्ण कल्याण समितीच्या सभेत वाचल्याने हा प्रकार निदर्शनास आला आहे.येथील ग्रामीण रूग्णालयात नुकतीच रूग्ण कल्याण नियामक मंडळाची सभा आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी येथे नव्याने रूजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ़एस़बी़इंगळे यांनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, पाणी समस्या, पाण्याच्या फुटक्या टाक्या, फ्लोराईडयुक्त पिण्यास अयोग्य पाणी, तुटलेली वायरींग, निकामी झालेली विद्युत व्यवस्था, इमारतीची भग्नावस्था, बाह्यरुग्ण विभागाची दुर्दशा, नादुरूस्त रूग्णवाहिका, सुरक्षा भिंतीची गरज, अत्यावश्यक औषधींचा तुटवडा, आयसी मटेरीयल टँकची सफाई, अशा विविध समस्या आमदारांपुढे थेट मांडल्या.या ग्रामीण रूग्णालयाला उर्जीतावस्था आणण्यासाठी डॉ.इंगळे यांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली़ तसेच रूग्ण कल्याण समितीला प्राप्त निधीचा कोणताच जमा-खर्च आपणास मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या कोणताच निधी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले. यानंतर रूग्णालयात फेरफटका मारला असता, बाह्यरुग्ण विभागाची दुर्दशा बसून सदर विभागात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कशा केल्या जात असेल, याची कल्पनाच करता येत नाही, असे आढळून आले. औषधीच्या गोदामात प्रवेश करताच आमदारांसह उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला़ कारण गोदामात हजारो रुपयांची कालबाह्य औषधी पडून होती. या रूग्णालयात यापूर्वी अस्थायी स्वरूपात कार्यरत डॉक्टरांनी रूग्णांना दवाखान्यातील औषधी न देता बाहेरून बोलावल्यानेच, औषधी साठा शिल्लक पडून न मुदतबाह्य झाल्याचे निदर्शनास आले़ याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे़ याप्रसंगी आमदारांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना देऊन सहकार्याचे आश्वासन दिले़ यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़विजय गावंडे, गटविकास अधिकारी बी़डी.गिरासे, पंचायत समिती सदस्य नानाजी डाखरे, वेणूताई काटवले, महेश पावडे, दुष्यंत जयस्वाल, उदय रायपुरे, डॉ़भास्कर महाकुलकर, रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)
मारेगाव ग्रामीण रूग्णालयाच्या गोदामात कालबाह्य औषधी
By admin | Updated: August 3, 2014 23:38 IST