बाभूळगाव परिसरातील फळांचा सडा : बदलत्या वातावरणाचा परिणामबाभूळगाव : गेल्या काही वर्षांपासून बेभरवशाच्या निसर्गाने पारंपरिक पिके नेस्तनाबूत केली. त्यावर मात करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळ पिकांची कास धरली. मात्र यंदा ऐन भरात आलेल्या संत्रा पिकालाही बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने शिवारात सर्वत्र फळांचा सडा पडला आहे. उत्पन्नात मोठी घट येणार असल्याने शेतकरी हवालदिल आहे. प्रामुख्याने उन्हाची तीव्रता वाढल्याचा हा परिणाम मानला जात आहे. संत्रा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. बाभूळगाव तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी संत्रा पीक घेतले. मात्र पीक हाती येण्याच्या काळात संत्री जमिनीवर पडून मोठे नुकसान झाले आहे. बाभूळगाव तालुक्यात यावर्षी संत्रा बागांमधील चांगले पीक आले होते. परंतु ऐन थंडीच्या दिवसात उन्हाची तीव्रता वाढत आहे. गेल्या एक महिन्यापासून उन्हाच्या दाहकतेने संत्र्याची फळे परिपक्व होण्यापूर्वीच झाडांवरून गळून पडत आहेत. अशा हजारो संत्रांचा सडा सध्या तालुक्यात प्रत्येक शिवारात आढळून येत आहे. यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. बहुतांश शेतांमध्ये हीच स्थिती असल्याने नेमके कोणते पीक आता यापुढे घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. बाभूळगाव येथील रहिवासी वसीम मिर्झा यांची खर्डा रस्त्यावर संत्र्याची वाडी आहे. एकंदर ५०० झाडे त्यांनी जगविली. त्यातील ३० टक्के संत्री जमिनीवर पडली आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. गळती थांबत नसल्याने अखेर त्यांनी अपरिपक्व संत्रीच तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही संत्री एक कॅरेट १०० रुपयाला अशा अत्यल्प भावाने त्यांना विकावी लागत आहेत. शासनाने संत्री उत्पादकांना मदत देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)संत्र्याची बेभाव विक्रीकेवळ सधन शेतकरीच संत्रा पीक घेतात, असा गेल्या काही वर्षातील समज आहे. मात्र पारंपरिक पिकातून हाती काहीच उरत नसल्याने सर्वसामान्य शेतकरीही आता संत्रा पिकाकडे वळला आहे. त्यातूनच बाभूळगाव तालुक्यातील अनेकांनी ओलिताची सोय करून यावर्षी मोठ्या प्रमाणात संत्र्याची लागवड केली. मात्र पीक हाती येण्याच्या वेळेसच फळे गळत असल्याने गरीब कास्तकारांना मोठा फटका बसला आहे. संत्र्यातून रग्गड उत्पन्न मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कास्तकारांना आता अत्यल्प भावात संत्रा विकावा लागत आहे.
संत्रा पिकाला फटका
By admin | Updated: October 30, 2015 02:20 IST