यवतमाळ : आपल्या दुष्काळी भागाची केंद्र शासनाच्या तपासणी पथकाने पाहणी करावी या भावनेतून त्यांचा रस्ता अडविणाऱ्या दोन डझन शेतकऱ्यांवर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुष्काळाने पिचलेल्या आणि पथकाच्या प्रतीक्षेत रात्र जागून काढलेल्या शेतकऱ्यांमध्ये या नव्या पोलिसी संकटामुळे तीव्र रोष पाहायला मिळत आहे.उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेताची पाहणी करण्याकरिता आलेल्या केंद्रीय पथक नियोजित स्थळी थांबले नाही म्हणून मार्गावर तार बांधून शेतकऱ्यांनी उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे रास्ता रोको केला. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी २० शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. मराठवाडा येथून निघालेले केंद्रीय पथक सायंकाळी ५ वाजता उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे शेतातील पिकांची पहाणी करण्याकरिता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे दुपारपासूनच शेकडो शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. सायंकाळी अंधार पडला तरी पथक पोहोचले नव्हते. शेकडो शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते. ७.३० वाजताच्या सुमारास पथक नागेशवाडीच्या जवळ आले. परंतु निर्धारित शेतात न थांबता पथक नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गाने सरळ निघून गेले. यावेळी पथक थांबले नसल्याने शेतकरी संतप्त झाले. मार्गावर तार बांधून त्यांनी वाहतूक अडविली. याची गंभीर दखल घेत उमरखेड पोलिसांनी नितीन सुरोशे यांच्यासह २० शेतकऱ्यांविरुद्ध वाहतूक अडविल्याचा गुन्हा दाखल केला. न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या या शेतकऱ्यांवर चक्क फौजदारी गुन्हा नोंदविला गेल्याने प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांवर आता पोलिसी संकट
By admin | Updated: December 18, 2014 02:21 IST