लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेतून पैसे दिले जातात. यावर विद्यार्थ्यांच्या भोजनाचे नियोजन अवलंबून असते. या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या विद्यार्थ्यांना डीबीटीचा मोबदलाच मिळाला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी स्थानिक बिरसामुंडा चौकात आंदोलन केले. सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
शिक्षणासाठी आदिवासी वसतिगृहात वास्तव्याला असणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सूविधा मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात, वारंवार मागनी केल्या नंतरही उपाय योजना झाल्या नाही. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. वसतिगृहाची स्वच्छता केली जात नाही. त्यांचे बेड नीटनेटके नाही. डीबीटीचे वाढीव पैसे नव्हे तर डीबीटीचा निर्धारित निधीही मिळाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करून निषेध नोंदविला. आता तरी शासन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणार का असा सवाल केला जात आहे.
वसतिगृहाला बाहेरून लावले होते कुलूपविद्यार्थ्यांचे आंदोलन पाहता वसतिगृहाला रात्रीच बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. वाढती महागाई पाहता विद्यार्थ्यांना डीबीटी मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
९ मार्च रोजी आदिवासी विकासमंत्र्यांनी बोलावली बैठकपांढरकवडा आणि पुसद आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गतच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा आढावा घेणार आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साधणार विद्यार्थ्यांशी संवादविद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्च्या अनुषंगाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके म्हणाले की, यवतमाळच्या आदिवासी वसतिगृहातील समस्यांबाबत मागील आठवड्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत चर्चाही झाली होती. परंतु मंगळवारी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. यावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. सध्या मुंबई येथे विधिमंडळ अधिवेशनात मी आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली. या विषयावर ९ मार्च रोजी पुन्हा सविस्तर बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या चर्चा करून निकाली काढणार आहे. विद्यार्थ्यांना तसे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
पीओंनी जाणून घेतले प्रश्नआंदोलनस्थळी प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. हे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. आंदोलन परत घेण्याची विनंती विद्यार्थ्यांना करण्यात आली.